आयआयआयटी जबलपूरच्या समृद्धी शर्मा आज गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर
आयआयटी किंवा आयआयएमची डिग्री नसतानाही समृद्धी शर्मा यांनी मेहनत, स्पर्धा आणि इंटर्नशिपच्या जोरावर गुगलमध्ये फुल-टाइम नोकरी मिळवली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कोडिंग आणि टेकच्या क्षेत्रात करिअर करायचे म्हटले की प्रत्येक तरुणाच्या मनात गुगलमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असतेच. अनेकांना असेही वाटते की गुगलचे दार उघडायचे असेल तर आयआयटी (IIT) किंवा आयआयएम (IIM) सारख्या मोठ्या संस्थेची डिग्री हवीच. गुगलच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर समृद्धी शर्मा यांची कहाणी मात्र वेगळीच गोष्ट सांगते आणि अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
समृद्धी शर्मा यांनी आयआयआयटी (IIIT) जबलपूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पुढचे सगळे आधीच ठरवून किंवा कडक प्लॅन आखून त्या चालल्या नाहीत. स्वतःची मेहनत, योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि सतत शिकत राहण्याची जिद्द, याच गोष्टींमुळे त्या जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीपर्यंत, म्हणजे गुगलपर्यंत पोहोचल्या.
कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच तांत्रिक समस्या सोडवणे आणि नवीन गोष्टी शिकणे याकडे त्यांचा ओढा होता. त्याच जोरावर त्यांनी गुगलच्या प्रतिष्ठित STEP (Student Training in Engineering Program) या प्रोग्रामच्या माध्यमातून २०२४ मध्ये आपली पहिली इंटर्नशिप मिळवली.
त्यानंतर २०२५ मध्ये त्यांनी गुगलमध्येच सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची दुसरी इंटर्नशिप पूर्ण केली. या काळात ऑटोमेटेड डेटा पाईपलाईन्स आणि रिअल-टाइम डॅशबोर्ड्स यांसारख्या अवघड प्रकल्पांवर त्यांनी काम केले. या अनुभवामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान पक्के झाले आणि कॉर्पोरेट जगातल्या बारीकसारीक गोष्टींशीही त्यांची ओळख झाली. काही काळ फिनटेक क्षेत्रात काम केल्यानंतर त्या फुल-टाइम सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून गुगलच्या टीमचा भाग झाल्या.
कॉलेजमध्ये असताना समृद्धी या आयआयआयटी जबलपूरच्या 'BitByte' या प्रोग्रामिंग क्लबच्या कोअर टीममध्ये होत्या. त्यांनी अनेक कोडिंग स्पर्धा आयोजित केल्या, ज्युनियर विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स घेतली आणि कॅम्पसमध्ये मजबूत डेव्हलपर कम्युनिटी उभी करण्यात मोठा वाटा उचलला. लीडर आणि टीम मेंबर म्हणून काम केल्यामुळे पुढे कॉर्पोरेट जगातल्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या तयार झाल्या. इतरांना शिकवल्याने आणि टीमसोबत पुढे गेल्याने समज आणखी वाढते, असा त्यांचा विश्वास आहे.
हॅकथॉनमध्येही त्यांनी आपली छाप पाडली. 'HackCBS 7.0' या नामांकित हॅकथॉनमध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यात त्यांनी स्केलेबल पीयर-टू-पीयर रिसोर्स-शेअरिंग प्लॅटफॉर्म तयार केला होता. त्या 'गूगल गर्ल हॅकथॉन'च्या फायनलिस्ट राहिल्या आहेत आणि 'Google Women Techmakers Engineering Fellowship' (WTEF) च्या स्कॉलरही ठरल्या आहेत. जावा, पायथन, सी, रिएक्ट आणि MIRN स्टॅक अशा आधुनिक तंत्रज्ञानावर असलेल्या पकडीमुळे त्या गर्दीतून वेगळ्या दिसल्या.
पुढच्या पाच ते दहा वर्षांत आपण कुठे असू, या विचाराने अनेक तरुण तणावात असतात. समृद्धी यांचा दृष्टिकोन मात्र वेगळा आणि व्यावहारिक आहे. संपूर्ण करिअरचा ब्लूप्रिंट आधीच तयार करण्याची अजिबात गरज नाही, असे त्यांचे मत आहे. एका वेळी एकच पाऊल पुढे टाकायचे, सध्या जिथे आहात तिथे शंभर टक्के द्यायचे आणि आजचे अनुभवच उद्याची दिशा ठरवतील यावर विश्वास ठेवायचा, असे त्या म्हणतात. अपयशाला घाबरण्यापेक्षा प्रत्येक अनुभवातून शिकणे हीच यशस्वी प्रोफेशनलची सर्वात मोठी खासियत असते, असेही त्या सांगतात.