बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 94 | Satisfactory 01:04 IST

कर्जतमधील झाडांच्या कत्तलीवर राज ठाकरेंना जैन मुनी निलेशचंद्रांचा पाठिंबा, आंदोलनात उतरणार

कर्जत-भीमाशंकरच्या साय डोंगरातील वृक्षतोडीवरून राज्यात संताप आहे. राज ठाकरेंनी बोलावले तर आंदोलनात सहभागी होईन, असे जैन मुनी निलेशचंद्र यांनी सांगितले.

कर्जतमधील झाडांच्या कत्तलीवर राज ठाकरेंना जैन मुनी निलेशचंद्रांचा पाठिंबा, आंदोलनात उतरणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

कर्जत-भीमाशंकर भागातल्या साय डोंगरात सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे सध्या सगळ्या राज्यात संतापाचं वातावरण आहे. स्थानिकांनी या वृक्षतोडीला तर विरोध केलाच आहे, पण टोरंट प्रकल्पासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयालाही त्यांनी थेट विरोध दर्शवला आहे. स्थानिकांनी आंदोलन सुरू केल्यानंतर पर्यावरण प्रेमी, निसर्ग मित्र आणि आता राजकीय नेतेही त्यांच्या बाजूने उभे राहत आहेत.

आमदार आदित्य ठाकरे यांनी साय डोंगरात जाऊन पाहणी केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे हेही तिथे भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

कर्जत-भीमाशंकरच्या डोंगरातल्या या प्रकारावरून सरकारला होणारा विरोध वाढत चालला आहे, आणि त्यांच्या पक्षातल्या काहींनीही विरोध केल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, कबूतर वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले निलेश चंद्रमुनी भीमाशंकर कर्जतमध्ये वृक्षतोड सुरू असताना कुठे आहेत, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत होत्या. त्यावर जैन मुनींनी आपली बाजू मांडली.

जैन मुनी म्हणाले, भगवान महावीरांचं म्हणणं आहे, "जिओ और जीने दो". त्यामुळे राज ठाकरे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करत असतील किंवा तो प्रश्न उपस्थित करत असतील, तर मी त्यांना पाठिंबा देतो. राज ठाकरे स्वतः पशुप्रेमी आहेत. कबुतराचा विषय तुम्ही वेगळा ठेवा. राज ठाकरे यांनी जी मोहीम आता सुरू केली आहे, जो विषय हाती घेतला आहे, तो वेगळा आहे. सगळ्या शिवप्रेमींना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मी आवाहन करतो की, राज ठाकरे यांना समर्थन द्या. प्राणी आणि झाडं वाचवण्यासाठी ते हा मुद्दा घेत आहेत.

राज ठाकरेंच्या या मुद्द्याला माझा पाठिंबा आहे, असं सांगून जैन मुनी पुढे म्हणाले की, राज ठाकरेंनी मला बोलावलं तर मी कर्जतला जाण्याच्या तयारीत आहे. पशुपक्ष्यांसाठी राज ठाकरे आंदोलन करत असतील, तर त्या आंदोलनात मी त्यांच्यासोबत सहभागी होईन.

आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना ते म्हणाले, मी कोणत्या पक्षाचा नाही, पण जो झाड वाचवेल, जीव वाचवेल, त्याच्यामागे जैन समाज उभा राहील. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, आणि बाळासाहेबांचा विचार जर राज ठाकरेंमध्ये असेल तर अर्थातच त्यांना समर्थन आहे. त्यांनी मला आमंत्रित केलं तर मी स्वतः या आंदोलनात जाईन. लोक म्हणत असतील की जैन मुनी आता कुठे गेले, तर मला त्या आंदोलनात सहभागी होण्याची स्वतःहून इच्छा आहे. या कंपन्यांमध्ये कोणी असो, अदानी असो, मंगल प्रभात लोढा असो की कोणीही जैन असो, त्यांचं समर्थन मी करणार नाही, असंही जैन मुनींनी स्पष्ट केलं.

या प्रकरणात महायुतीतला घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही आज जंगल भागातल्या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. स्थानिक, पर्यावरणप्रेमी आणि शेतकऱ्यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आजही मोहीम राबवण्यात आली. प्रकल्पाच्या जनसुनावणीत स्थानिकांपैकी 90 टक्के लोकांनी विरोध केला असताना असे प्रकल्प कसे उभे राहतात, असा सवाल घारे यांनी उपस्थित केला.

कबूतर वाचवण्याच्या मुद्द्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या निलेशचंद्र मुनी यांनीही आता वृक्षतोडीला आपला विरोध असल्याचं म्हटलं आहे.

#मुंबई#PT24#Mumbai

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ