कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचा कामावर येताना गाडीतच मृत्यू
उलवे येथून पोलीस स्टेशनला निघालेल्या गायकवाड यांना प्रवासात अस्वस्थ वाटू लागले आणि गाडीतच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एकाच महिन्यात दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईतील कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कुमार गायकवाड यांचा कामावर येत असतानाच गाडीत मृत्यू झाला. कर्तव्यावर असतानाच अचानक असा शेवट झाल्याने पोलीस खात्यात हळहळ व्यक्त होत आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
गायकवाड हे नवी मुंबईतील उलवे येथे राहत होते. आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांनी पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर ते उलवे येथील घरी गेले होते. आज सकाळी ते घरातून पोलीस स्टेशनला यायला निघाले, पण स्टेशनला पोहोचण्यापूर्वीच त्यांचा जीव गेला.
प्रवासात असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी सोबत असलेल्या ड्रायव्हरला आणि ऑपरेटरला तसे सांगितले. "मला बरं वाटत नाही, थोडा गाडीतच आराम करतो, मला उशी द्या," असे म्हणून ते गाडीतच झोपले.
गाडी कुरार पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर ड्रायव्हरने त्यांना आवाज दिला, पण ते उठले नाहीत. म्हणून ड्रायव्हरने हाताने हलवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांचे शरीर पूर्ण थंड पडल्याचे दिसले आणि तोंडातून फेसही आला होता. ड्रायव्हर आणि ऑपरेटर यांनी लगेच त्यांना मालाड पठाणवाडी येथील डीएनए रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच ते गेल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
एकाच महिन्यात दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव यांचाही असाच दुर्दैवी मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, हे दोघेही अधिकारी अवघ्या सात महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक पदावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळून आले होते.
या घटनांनंतर पोलीस वर्तुळात कामाच्या ताणाची चर्चा सुरू झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच हद्दीतील फेरीवाले, वाघरी, एसआरए, एमएमआरडीए, फॉरेस्ट वन विभाग आणि इतर कामांसाठी वरिष्ठांकडून सतत तगादा लावला जातो, त्यामुळे अनेक अधिकारी तणावात काम करतात, असे बोलले जात आहे. कामाचा ताण आणि वरिष्ठांचा दबाव यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन हे मृत्यू झाले, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी पोलीस दलात मोठी नाराजी असल्याचेही बोलले जाते.
इतक्या तरुण वयात अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे पोलिसांच्या कामाच्या वेळा, सुट्ट्या आणि आरोग्याच्या समस्या हे प्रश्न पुन्हा एकदा समोर आले आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.