बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 160 | Moderate 01:40 IST

कर्जतचा पंप स्टोरेज प्रकल्प पुढच्या 100 वर्षांची हानी टाळणार, फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

रायगडच्या कर्जतमधील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगितले.

कर्जतचा पंप स्टोरेज प्रकल्प पुढच्या 100 वर्षांची हानी टाळणार, फडणवीसांचे विरोधकांना उत्तर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात गुजरातच्या टोरेंट पॉवर कंपनीचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पावरून राजकारण चांगलेच तापले आहे. पर्यावरणवादी आधीपासून विरोधात होते, आता विरोधकही सरकारवर आक्रमक झाले आहेत. प्रकल्पासाठी सायडोंगर परिसरात वृक्षतोड सुरू आहे आणि त्यावरूनच टीका होत आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रकल्पाला होत असलेला विरोध कोणताही अभ्यास न करता होत आहे, असे फडणवीस म्हणाले. इथे होणारी हानी तात्पुरत्या स्वरूपाची आहे, पण त्यातून भविष्यात होणारी हजारोपट हानी आपण रोखत आहोत, असे त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, "हा प्रकल्प पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सोलर आणि विंड या दोन ऊर्जा आपण तयार करतो. पण त्या 24 तास मिळत नाहीत. त्यामुळे ग्रीडवर त्याचा परिणाम होतो. 24 तास स्वच्छ ऊर्जा मिळवण्यासाठी पंप स्टोरेज ही ऊर्जा वापरली जाते. या प्रकल्पामधून 3 हजार मेगावॅट ऊर्जा तयार होणार आहे. एवढी ऊर्जा कोळशापासून तयार करायची असेल तर त्यासाठी 28 कोटी झाडे लागतील."

या प्रकल्पासाठी 90 हजार झाडे लावण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रकल्पासाठी जेवढी जागा दिली जाणार आहे, त्याच्या दुप्पट जागा वनविभागाला देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, "पंप स्टोरेजचे आयुष्य 80 वर्षे असून हे तंत्रज्ञान पूर्णपणे भारतात तयार होणार आहे. यातून पुढच्या 100 वर्षांची हानी टाळण्यात येणार आहे. आता जी काही तात्पुरती हानी होत आहे, पण त्याच्या कितीतरी हजारपट हानी आपण टाळणार आहोत."

विरोधकांवर बोलताना फडणवीस म्हणाले, "या प्रकल्पावरून जो काही आरोप होत आहे तो अभ्यास न करता सुरू आहे. पर्यावरणाच्या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका विरोधक घेत आहेत. याचा योग्य अभ्यास केला तर होणारा विरोध किती राजकीय आहे हे समोर येईल. यामध्ये काही जणांचा विरोध असेल तर आम्ही त्याचा विचार करू. यापेक्षा जर अधिक चांगली टेक्नॉलॉजी असेल तर त्यांनी आम्हाला सांगावे."

कर्जतचा प्रकल्प मराठवाडा किंवा विदर्भात न्या, अशी मागणी काही जण करत आहेत. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "पंप स्टोरेज कुठेही करता येत नाही. त्यासाठी काही निवडक जागा शोधण्यात आल्या आहेत. पंप स्टोरेज प्रकल्प हे ग्रीन प्रकल्प आहेत. म्हणून त्याची लाईफ सायकल पर्यावरणपूरक आहे. कर्जतची जागा यासाठी योग्य आहे."

अशाच प्रकारचा विरोध आरेतील वृक्षतोडीलाही झाला होता, असे मुख्यमंत्र्यांनी आठवण करून दिली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची वस्तुस्थिती समोर आणली आणि विरोध करणाऱ्यांचे कान टोचले, असे ते म्हणाले.

#मुंबई#PT24#Mumbai

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ