कर्जतमधील वृक्षतोडीवरून मनसे मैदानात, 27 तारखेच्या सभेत ठरणार पुढच्या आंदोलनाची दिशा
टोरेंट प्रकल्पासाठी कर्जत-भीमाशंकर परिसरात होणाऱ्या वृक्षतोडीला मनसेने विरोध केला आहे. संदीप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात कर्जत-भीमाशंकर जंगल परिसरात टोरेंट जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी हजारो झाडांची कत्तल सुरू आहे. या वृक्षतोडीच्या विरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरली असून मनसेने या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार टीका केली.
देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीचा ठराव घेतलेला नाही आणि ठराव मंजूरही झालेला नसताना वृक्षतोड सुरू करण्यात आली. स्थानिकांना विश्वासात घेतले गेले नाही. आदिवासी बांधवांचे आणि स्थानिकांचे पुढे काय होणार, याबद्दल कुठलीही माहिती दिली गेली नाही. स्थानिकांचा विरोध डावलून काम पुढे रेटले जात आहे, असा त्यांचा आरोप आहे.
येत्या 27 तारखेला कर्जतमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्या सभेत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे देशपांडे यांनी सांगितले.
सरकारवर निशाणा साधताना देशपांडे म्हणाले, की सरकार उद्योगपतींच्या घशात जमिनी घालण्यासाठी हे सगळे करत आहे का? नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या वेळीही तेच झाले. वनमंत्री गणेश नाईक याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 22 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावरील डॉक्युमेंट्रीची एक पोस्ट टाकली होती. ही पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीचा मान राखून आपण ती पोस्ट हटवत आहोत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावरही देशपांडे यांनी भाष्य केले आणि सरकारला धारेवर धरले.
देशपांडे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मुंबई पोलिसांना अशी विनंती करायची गरज का लागली? कोणाचा दबाव होता? ते पोलिसांचे काम आहे का? बिष्णोईचे गुंड येतात, हल्ला करतात, तर ते बघायला पोलिसांना वेळ आहे का? ही लोकशाही असेल, तर हे पोलिसांचे काम आहे का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
सरकार आंदोलनाला का घाबरत आहे, असाही प्रश्न त्यांनी विचारला. त्यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण देशात असंतोष आहे आणि सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. म्हणूनच हे डिलीट करा, ते डिलीट करा, असे सांगितले जात आहे. देशात अशांतता आहे, म्हणून सरकार घाबरले आहे. आंदोलकांचे काही प्रश्न असतील, तर त्यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे, असे संदीप देशपांडे म्हणाले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.