सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 310 | Very Poor 17:50 IST

कर्जतमधील टोरेंट प्रकल्पासाठी झाडांवर कुऱ्हाड चालू देणार नाही, सयाजी शिंदे यांचा इशारा

रायगडच्या कर्जतमध्ये प्रस्तावित टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते एकवटले आहेत.

कर्जतमधील टोरेंट प्रकल्पासाठी झाडांवर कुऱ्हाड चालू देणार नाही, सयाजी शिंदे यांचा इशारा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रायगडच्या कर्जतमध्ये गुजरातच्या टोरेंट कंपनीचा एक प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी एकीकडे वृक्षतोड सुरू आहे आणि त्याचवेळी या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते एकत्र आले आहेत. अभिनेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी या प्रकल्पासाठी एकही झाड तोडू दिले जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले.

कुणी झाडे तोडायला आले, तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असे समजा आणि हातात ताटे व वाट्या घेऊन त्या वाजवत त्यांना हाकलून लावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. सह्याद्री हे जगातले एक मोठे आश्चर्य आहे, असे ते म्हणाले. पशुपक्ष्यांच्या घरावर बॉम्ब टाकून आणि त्यांना उद्ध्वस्त करून आपण काय साध्य करतोय, असा सवालही त्यांनी केला. टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी यापुढे कर्जत-भिमाशंकर परिसरात एकही झाड तोडू देणार नाही, असेही ते म्हणाले.

हा ऊर्जा प्रकल्प भिमाशंकर अभयारण्याच्या बाजूला प्रस्तावित आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून आतापर्यंत हजारो झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिंदे म्हणाले, "विकासकामांच्या नावावर जमिनी घेतल्या तर तिथल्या पुढच्या पिढ्या भिकेला लागतील. यापुढे एकही झाड तोडू देऊ नका, नाहीतर विकास संपलेला आहे असे समजा. एकही झाड न तोडता हा प्रकल्प करावा, आमचा त्याला विरोध नाही. जगात फक्त 18 टक्के जंगले शिल्लक आहेत. ते आपल्याला 33 टक्के करणे आवश्यक आहे. पण ते वाढवण्याऐवजी ही झाडे तोडली जात आहेत."

शेकरू हा राज्यप्राणी भिमाशंकर अभयारण्यात आहे. पण आपण फक्त अभयारण्यातच राहायचे, बाजूच्या कर्जतमध्ये जायचे नाही, ही सीमा त्याला कशी समजणार, असा प्रश्न शिंदे यांनी विचारला. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची झाडे तोडून आपण काय करतोय, असेही त्यांनी विचारले.

यापुढे टोरेंटसारखा एकही प्रकल्प आम्हाला नको, असे सांगत शिंदे म्हणाले की त्यासाठी कोणतीही झाडे तोडायला नकोत. जी जुनी पर्यावरणाची व्यवस्था आहे, तिला हात न लावता हे प्रकल्प करा. पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे का, असा सवाल करत, आहे ती मोठी झाडे तोडू नका हीच आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

सेव्ह सह्याद्री नावाची एक संघटना तयार करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यात एक लाख मुलांना जोडणार असून, त्या माध्यमातून सह्याद्रीत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अशा प्रकल्पांना विरोध करू, असेही ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेत अनेक पर्यावरणवाद्यांनी आपली मते मांडली. नाशिकमध्ये हजारो झाडे तोडली जात आहेत, शक्तिपीठसाठीही झाडे तोडली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. पालघरच्या एमआयडीसी प्रकल्पासाठी पाच लाख झाडे आणि शिरोडला 70 हजार झाडे तोडली जाणार आहेत. राज्यातील अनेक प्रकल्पांसाठी मिळून 10 लाख झाडे तोडली जाणार आहेत. ही शासकीय आकडेवारी आहे, त्यामुळे यापेक्षा तिप्पट झाडे तोडली जातील असा आमचा संशय आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यातून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि आपली संवेदनशीलता संपत चालली आहे, असेही मत मांडण्यात आले. चुकीच्या गोष्टींना विरोध केल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाहीत, त्यासाठी जी काही कायदेशीर प्रक्रिया गरजेची आहे ती आम्ही करू, असेही सांगण्यात आले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ