सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 310 | Very Poor 20:17 IST

वृक्षतोडीवरून जरांगे पाटील संतापले; २८ ऑक्टोबरला कर्जत-भीमाशंकरला देणार भेट

कर्जत-भीमाशंकर भागातील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली असून ते साय डोंगर परिसराला भेट देणार आहेत.

वृक्षतोडीवरून जरांगे पाटील संतापले; २८ ऑक्टोबरला कर्जत-भीमाशंकरला देणार भेट छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवरून सध्या लोकांमध्ये नाराजी आहे. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आणि हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे कर्जत-भीमाशंकर भागातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. याच वृक्षतोडीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील संतप्त झाले असून ते त्या परिसराला प्रत्यक्ष भेट देणार आहेत.

शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याआधी कर्जतमधील साय डोंगर परिसरात जाऊन स्थानिकांशी संवाद साधला होता. त्यानंतर आता जरांगे पाटीलही झाडे तोडली गेलेल्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांशी चर्चा करणार आहेत.

आपला कार्यक्रम जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितला. मी उद्या बीड दौरा करणार आहे, असे त्यांनी सांगितले. अंतरावली आंदोलनात ज्या कुटुंबातील व्यक्तीचे बलिदान गेले, त्या कुटुंबाची ते सांत्वन भेट घेणार आहेत. त्यानंतर केज तालुक्यात सप्ताहाला हजेरी लावणार आहेत. उद्या दुपारी २ नंतर ते बीडमधून रवाना होतील आणि अहिल्यानगरमार्गे कर्जत-भीमाशंकरकडे साय डोंगर परिसरात जातील. बुधवार २८ ऑक्टोबर रोजी आम्ही कर्जत-भीमाशंकरला भेट देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

जंगलतोड आणि वृक्षतोडीच्या बाबतीत सरकारने लोकांच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत, हे सरकारच्या डोक्यात का येत नाही, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. एकीकडे ३३ कोटी झाडे लावायची आणि दुसरीकडे आपणच झाडे तोडायची, असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवले. सरकारचा कारभार दंडेलशाहीने सुरू आहे, असेही ते म्हणाले. पूर्वी इंग्रजांकडून जेवढा त्रास होत नव्हता, तेवढा यांच्याकडून होत आहे, असे म्हणत त्यांनी वृक्षतोडीवरून महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही या वृक्षतोडीला विरोध केला आहे. आधीच अल निनोचे संकट आहे, पाऊस पडत नाही आणि तरीही विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल केली जात आहे, असे ते म्हणाले. प्रकल्प जिथे न्यायचा असेल तिथे न्या, पण ही वृक्षतोड थांबवा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारचे दिवस भरत आले आहेत, असे सांगून ते म्हणाले की प्रत्येक वेळी पर्यावरणपूरक प्रकल्प असल्याचे सांगून फसवणूक केली जाते आणि हजारो झाडे तोडली जातात. सरकारने हे तातडीने थांबवले नाही, तर मोठ्या प्रमाणात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा तुपकर यांनी भीमाशंकर येथील वृक्षतोडीबाबत दिला.

आदित्य ठाकरे यांनीही सरकारला इशारा दिला आहे. आमच्या महाराष्ट्राची जमीन विकू देणार नाही, मरण आले तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये, असे म्हणत त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी आणि जंगलतोडीविरोधात आपला तीव्र विरोध दाखवून दिला. तुम्ही वृक्षतोड थांबवली, याबद्दल अभिनंदन, असे सांगत त्यांनी स्थानिकांचे कौतुक केले. तुम्हीही इथे चिपको आंदोलन करा, आपल्या जंगलाला हात लावू द्यायचा नाही, असे सांगून त्यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याची सूचना स्थानिकांना केली.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ