सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:47 IST

ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी, सत्य समोर यावे: वडेट्टीवारांची मागणी, सत्ताधाऱ्यांवर टीका

मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे सरकारचा खरा चेहरा जनतेपुढे आला, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ऑडिओ क्लिपची चौकशी व्हावी, सत्य समोर यावे: वडेट्टीवारांची मागणी, सत्ताधाऱ्यांवर टीका छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली ऑडिओ क्लिप सध्या महाराष्ट्रात चांगलीच गाजत आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्लिप पुढे आणल्याबद्दल जरांगे पाटलांचे मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला, असे ते म्हणाले.

वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार भाजप आणि शिंदेसेना सत्तेसाठी भुकेले आहेत. ओबीसी असोत की मराठा, कोणाचेही काढून न घेता या समाजांना न्याय द्यावा आणि कोणाचेही नुकसान होऊ देऊ नये, अशी आमची भूमिका पहिल्यापासून होती, असे त्यांनी सांगितले. सत्तेतील या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री होण्याची चढाओढ सुरू आहे आणि त्यासाठी काहीही करायची तयारी दिसते, असा आरोप त्यांनी केला.

एकनाथभाऊ आणि देवाभाऊ यांनी ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावून महाराष्ट्राच्या जनतेचे वाटोळे केले, असे वडेट्टीवार म्हणाले. सत्तेत येण्यासाठी दोन समाजांमध्ये भांडण लावण्याचे काम त्यांनी केले, त्यातून खुर्ची मिळवली आणि आता त्याच खुर्चीसाठी वाद चालला आहे, अशी टीका त्यांनी केली.

ही क्लिप कोणी बाहेर आणली, याची चौकशी व्हायलाच हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही चौकशी कोणत्या स्तरावर करायची, हे सत्तेत बसलेल्या दोन्ही पक्षांनी ठरवावे, असे ते म्हणाले. मात्र या सगळ्यातून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे त्यांची भांडणे आता विकोपाला गेली आहेत, असे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे.

राज्यापुढे प्रश्न आहेत, दुष्काळ आहे, एमपीएससीची वाट लागली आहे, तरीही अशा क्लिप बाहेर काढून सत्तेसाठी कुठल्या थराला जायचे, असा सवाल त्यांनी केला. हे लोक जनतेचे नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोणाचा जीव गेला काय किंवा भांडून कोणी मेले काय, त्यांना काही घेणेदेणे नाही, हे अधोरेखित झाले आहे, असेही ते म्हणाले. या क्लिपमुळे दोन्ही पक्षांतील दरी प्रचंड वाढली आहे आणि ते कुठेही लपून राहिलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

ऑडिओ क्लिपमधील सत्य काय आहे, असा प्रश्न विचारून वडेट्टीवार म्हणाले की, आकडा 500 आहे, 2000 आहे की आणखी काही आहे, हे समोर यायला हवे. क्लिप आली आहे, त्यामुळे तिची चौकशी झालीच पाहिजे, हे आमचे स्पष्ट मत आहे. चौकशी कोणाची करायची, हा सरकारचा प्रश्न आहे.

ईडीमार्फत करा किंवा सीबीआयमार्फत करा, सरकारला जे योग्य वाटते ते करा, पण वस्तुस्थिती लोकांपुढे आणा, अशी मागणी त्यांनी केली. यात कोणी कोणाला बदनाम करत असेल, तर तीही वस्तुस्थिती समोर आली पाहिजे आणि सत्य उघड झाले पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ