जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदमांचा भाजपवर आरोप, शिंदेंविरोधात कटाचा दावा
मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर आरोप केले आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आणल्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हायरल क्लिपनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट भाजपवर पलटवार केला आहे.
कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले. दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल केली. यावर बोलताना कदम यांनी विचारले की, एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी भाजपने कुणाकडून सुपारी घेतली आहे? या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जरांगे पाटील हे भाजप नेते प्रसाद लाड यांच्यासोबत जेवण करतात, असे कदम यांनी सांगितले. जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांची भेट घेतल्याचे फोटोही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. त्यामुळे जरांगे पाटील आणि भाजपचे नेते एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कट रचत आहेत, असा दावा कदम यांनी केला. जरांगे पाटील सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही त्यांचा आरोप आहे.
कदम म्हणाले की, जरांगे यांनी व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप खरी आहे आणि ती जरांगे यांच्या जवळच्या लोकांनीच आपल्याला दिली आहे. वेळ आलीच तर त्यांचे नावही आपण उघड करू, असे ते म्हणाले.
दरम्यान, ही क्लिप कदम यांच्याकडे आधी कशी आली, ती मिळण्याची वेळ आणि दिवस त्यांना कसा माहिती होता, म्हणजे तेच फुटीर आहेत का, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कदम म्हणाले की, जरांगे पाटील सुपारी घेऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा भाजपने उचलला आहे, पण जरांगे यांची सगळी बंडखोरी आता समोर येऊ लागली आहे. जरांगे यांनी ऐकवलेली ऑडिओ क्लिप एआय जनरेटेड नाही, असेही ते म्हणाले. एक दिवस मराठा समाजच तुम्हाला उद्ध्वस्त करेल, असा इशारा त्यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी भाजपमधून नेमके कुणाचे प्रयत्न सुरू आहेत, याची चौकशी झाली पाहिजे आणि ते समोर आले पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली. यासाठी आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिंदे यांना बदनाम करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी कुणी सुपारी घेतली असेल, तर मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि तुम्हाला सोडणारही नाही, असा इशाराही कदम यांनी दिला.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.