500 कोटींच्या क्लिपवरून राज ठाकरेंचा फडणवीस सरकारवर हल्ला, फॉरेन्सिकवर सवाल
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट प्रश्न विचारले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या क्लिपवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट लिहून सरकारला धारेवर धरलं आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी या कथित रेकॉर्डिंगचा उल्लेख "फ्रेंडशिप फाईल" असा केला आहे. भाजपचे काही पदाधिकारी, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व्यक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आणि काही यूट्यूब प्रभावक यांच्यातलं हे संभाषण असल्याचा दावा त्यांनी केला.
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, "सध्या महाराष्ट्रात एक 'फ्रेंडशिप फाईल' ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल." या क्लिपमध्ये स्वतःला निष्पक्ष राजकीय विश्लेषक म्हणवणारे, पण खरंतर भारतीय जनता पक्षाच्या चिखलफेक सैन्याचं चिलखत घालून फिरणारे काही यूट्यूब प्रभावक आहेत, असंही ते म्हणाले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या संभाषणात कोणी कोणाला ५०० कोटी दिले इथपासून माध्यमांना आम्ही कशी जरब दाखवू शकतो, इथपर्यंत चर्चा ऐकायला येते. एखादा भावनिक मुद्दा सरकारच्या अंगाशी आला तर लोकांचं लक्ष त्यावरून कसं भरकटवायचं, त्यासाठी नवीन धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा कसा रेटायचा आणि त्यासाठी काय करायचं, याचीही चर्चा त्यात आहे, असं त्यांनी सांगितलं.
ही क्लिप खरंतर २९ मिनिटांची आहे, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं. त्यातला ५०० कोटींचा मुद्दा गाजतोय, त्यावर खुलासे येतील आणि यायलाच पाहिजेत, असं ते म्हणाले. मात्र भारतीय जनता पक्ष कोणत्या पद्धतीने समाज माध्यमं आणि माध्यमं यांच्यावर दडपशाही आणत आहे, यावरही चर्चा व्हायला हवी, असं त्यांनी स्पष्ट केलं.
फॉरेन्सिक चौकशीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं. मी ऑडिओ क्लिपचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवला आहे असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आहे, असं ते म्हणाले. फॉरेन्सिक अहवाल हा ऑडिओ किंवा व्हिडिओची तथ्यता तपासण्यासाठी, तसंच खून, बलात्कार, आर्थिक घोटाळे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतल्या पुराव्यांची तथ्यता पाहण्यासाठी मागवला जातो, असं त्यांनी सांगितलं.
"खरतर यातलं संभाषण ऐकलं तर समजतंच आहे की हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच आहे," असं राज ठाकरे यांनी म्हटलं. जे बोललं गेलं आहे ते गंभीर आहे आणि त्याची तपासणी व्हायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांना मान्य आहे, हे बरं झालं, असा टोलाही त्यांनी लगावला. पुराव्यातील तथ्य तपासाच, पण यात जे बोललं गेलं आहे त्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ असाल, तर तुमच्या पाठीमागे काय काय सुरू होतं हेही तपासा, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले होते की ही क्लिप बहुधा २ वर्षांपूर्वीची असावी, ती आत्ताच का आली? यावर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की ही क्लिप बाहेर आली कशी आणि ती आणली कोणी, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारमध्ये नेहमीप्रमाणे शहा काट'शाहाचं' राजकारणच दिसतंय, असंही त्यांनी म्हटलं.
शेवटी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं की फॉरेन्सिक अहवाल आणि त्यातली तांत्रिकता यात महाराष्ट्राला गोल गोल फिरवू नका. महाराष्ट्राला जे कळायचं आहे ते कळलं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात आणि तुम्ही कारवाई केली आहे, हे महाराष्ट्राला दाखवून द्या. तरच या फॉरेन्सिकला अर्थ आहे, अन्यथा तो तुमच्या फायद्यासाठी वाकवलेला फॉरेन्सिक ठरेल, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.