सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 07:46 IST

500 कोटींच्या क्लिपवरून भाजप-शिंदे गटात वाद; मुनगंटीवार म्हणाले, मैत्रीत भीती नसते

500 कोटींच्या क्लिपवरून भाजप-शिंदे गटात वाद; मुनगंटीवार म्हणाले, मैत्रीत भीती नसते छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

एका क्लिपमधील 500 कोटींच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटात सध्या जोरदार जुंपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची सुपारी कोणी घेतली होती आणि त्यासाठी जरांगेंना मदत कुणी केली होती, असे सवाल भाजपच्या नेत्यांनी शिंदे गटाला केले आहेत. भाजपने या मुद्द्यावरून शिंदे गटाची चांगलीच पिसे काढली आहेत.

या सगळ्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. कोणी कुणाला संपवू शकत नाही, असे ते म्हणाले. संपवायचे म्हटले तर माणूस स्वत:च्या चुकांनीच अडचणीत येतो, असे सांगून त्यांनी सूचक विधान केले. जनतेचा आशीर्वाद पदाशी जोडलेला नसतो, तो कामाशी जोडलेला असतो, असेही त्यांनी म्हटले.

भाजपला एकनाथ शिंदे यांची भीती वाटते, असा दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यावरही मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. कशाला भीती वाटेल, शिंदे आमचे मित्र आहेत आणि मित्रच राहतील, असे ते म्हणाले. मित्रांमध्ये भीती वाटायला लागली तर ते राजकारण राहणार नाही, असे सांगतानाच महायुतीत अशी विधाने होऊ नयेत, असेही त्यांनी म्हटले. कल्पोकल्पित गोष्टींकडे लक्ष देऊ नका, हा राजकारणाच्या डावपेचांचा भाग असू शकतो, असे सांगून भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला.

पैसे कोणी देणार नाही आणि घेणार नाही, असे सांगत त्यांनी या क्लिपच्या गोष्टीची तुलना एका कथेशी केली. कोंबडीचे पिल्लू आकाश पडले म्हणून धावत सुटले, पण नंतर कळले की झाडाचे पान पडले होते, अशी ही अवस्था आहे. नवा शास्त्रज्ञ दुर्बिणीला डोळा लावतो, आकाशाकडे पाहून मोठे वादळ येणार म्हणून ओरडत सुटतो, पण नंतर कळते की भिंगावर माशी बसली होती. या शास्त्रज्ञासारखीच या लोकांची अवस्था आहे, असे ते म्हणाले. कल्पोकल्पित गोष्टीवर भाष्य केले तर राजकारणात असे पायंडे पडतील, उद्या कोणीही दोन माणसे अशी क्लिप बनवून कुणाचीही बदनामी करतील, मग प्रत्येकालाच अटक करत सुटायचे का, असा सवाल त्यांनी केला.

500 कोटी कोणी कुणाला देईल का, ही कॉमनसेन्सची गोष्ट आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. मनोज जरांगे सच्चे कार्यकर्ता आहेत, ते कशाला पैसे घेतील, असे असते तर ते राजकारणात आले असते आणि एखादे पद घेतले असते, असेही त्यांनी सांगितले. शिंदे साहेब देणार नाहीत आणि जरांगे घेणार नाहीत, याची आपल्याला खात्री आहे, असे ते म्हणाले.

क्लिपमुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात परिपक्वता वाढणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. अशा ऑडिओ क्लिपला गंभीरपणे घेण्याची गरज नाही. कल्पोकल्पित व्हिडीओ क्लिप येतात आणि काळानुरूप गडप होतात, हे आधीही पाहिले आहे. क्लिपमध्ये कुणाबद्दल कोण काय बोलणार हे आपल्या हातात नसते, ती कधी कधी एआय आधारीत असू शकते, असेही त्यांनी म्हटले.

सामान्य लोकांना क्लिपपेक्षा दुष्काळावर चॅनल्सवर चर्चा व्हावी असे वाटते, असे मुनगंटीवार म्हणाले. जो शेतकरी कष्टाने अन्न पिकवतो आणि तुमच्या माझ्या ताटापर्यंत पोहोचवतो, त्याची चर्चा चॅनलवरून गायब आहे. दंतकथेवर आधारीत क्लिपच्या चर्चा चालवल्या जातात हे योग्य नाही, हा राजकारणातील चक्रव्यूहाचा भाग झाला आहे. आर्टिफिशियल ऑडिओ क्लिप करायच्या, त्यावर चर्चा घडवून आणायच्या आणि राजकारणाचा स्तर खाली जाताना पाहायचे हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ