बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:54 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांचे यूकेच्या उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहन

महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणूक परिसंस्थेची माहिती दिली, तर राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राला भारतातील सर्वात योग्य ठिकाण म्हटले.

हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था आहे, असे सांगून त्यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांनी इथे गुंतवणूक करावी, असे आवाहन केले. सर्व क्षेत्रांतील उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी अशी परिसंस्था उभी करण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे, असेही ते म्हणाले.

गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे जावेत म्हणून 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यूकेमधील सचिव, महापौर आणि अधिकारी यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट नाही; दोन्ही देशांमधील महत्त्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा हा प्रयत्न आहे, असेही त्यांनी म्हटले.

कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबळगण, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते. यूकेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर विविध महत्त्वाच्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि यूके यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेला जागतिक बाजारपेठांशी थेट जोडते, तर पुणे हे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यभरातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणारे अनुभवी भागीदार यांचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली असून 'युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल', 'युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क' आणि 'युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन' यांसारखी जागतिक विद्यापीठे राज्यात येत आहेत. राज्यात उभारल्या जाणाऱ्या एज्युसिटी, मेडिसिटी आणि एआय इनोव्हेशन सिटीमुळे जागतिक दर्जाचे संशोधन, संस्था आणि प्रतिभा एकत्र येईल, असेही त्यांनी सांगितले.

औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनसंपत्तीचे पुनर्नवीकरण यांसारख्या स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना महाराष्ट्रात मोठा वाव आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जागतिक कंपन्यांना त्यांची 'ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स' आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे महाराष्ट्रात उभारायची असतील, तर राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या भागीदारीमुळे स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा आणि ग्राहक मिळवण्याची संधी मिळेल. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध करारांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीतून अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स म्हणाले, यूकेच्या ज्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे, त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे सर्वात नैसर्गिक आणि योग्य ठिकाण आहे. या राज्याची निवड त्याची स्पष्ट आर्थिक ताकद, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्व यामुळे केली आहे. राज्याची अर्थव्यवस्था युरोपमधील नॉर्वे देशापेक्षाही मोठी आहे. आपण महाराष्ट्रात केवळ एका कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी आलेलो नाही, तर आम्हाला प्रत्यक्ष परिणाम आणि यश हवे आहे. दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकत्र येऊन हे काम पुढे न्यावे आणि दोन्ही देशांच्या प्रगतीला गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला यूकेमधील स्कॉटलंडचे पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार सचिव डेम अँज्युला ईगल, राज्य सचिव डग्लस अलेक्झांडर, ईयू आणि आंतरराष्ट्रीय व्यापारचे संचालक सोफी ब्राईस, दक्षिण आशियासाठी यूकेचे उप-व्यापार आयुक्त हरशबीर संघा, इंग्लंडचे दक्षिण आशियासाठी व्यापार आयुक्त आणि पश्चिम भारतासाठी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, तसेच महापौर आदी उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ