बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:31 IST

गोंदियात वृद्धाश्रमात ज्येष्ठांसाठी कार्यक्रम; आजी-आजोबांकडून जगण्याची शैली मिळते, वरुडकर यांचे प्रतिपादन

सेवा संकल्प अभियानांतर्गत गोंदियातील 'सावली' निवारा केंद्रातील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम झाला.

गोंदिया येथील सिव्हिल लाईन भागातील 'सावली' शहरी बेघर निवारा केंद्रातील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सेवा संकल्प अभियानांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी भारती वरुडकर होत्या.

व्यासपीठावर माय भारतचे उपसंचालक सौरभ निशाद, जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर, सेंट झेवियर्स हायस्कूलच्या समन्वयक आफरीन मॅडम तसेच श्वाती वैद्य आणि विहान मोटकुरे उपस्थित होते.

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने विचारपूस करणारी माणसे कमी होत चालली आहेत, असे वरुडकर यांनी सांगितले. वृद्धांना अनेकदा एकाकीपणाचा सामना करावा लागतो, म्हणून त्यांच्यासाठी वेळ देणे, त्यांच्याशी बोलणे आणि त्यांना सन्मानाने वागवणे गरजेचे आहे. जीवन जगण्याची शैली आपल्याला आजी-आजोबांकडून मिळते, असे त्या म्हणाल्या.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी राबवला जाणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे सांगून वरुडकर म्हणाल्या की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही शिकत असतो. त्यामुळे वृद्धांना आनंदी ठेवणे आणि त्यांना भावनिक आधार देणे महत्त्वाचे आहे. समवयस्कांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते आणि मने जुळतात. ज्याच्या आयुष्यात मित्र असतात, तो एकटा राहत नाही. म्हातारपणी एकटेपणा जाणवू लागला तर आवडीचे छंद जोपासले पाहिजेत. छंदांमुळे मन प्रसन्न राहते आणि जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहता येते.

तरुणांनी वेळ मिळेल तेव्हा वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या आजी-आजोबांसह सर्व ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने वागवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या.

अंजु निमसरकर यांनी सांगितले की, सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि नवा उत्साह आणण्याचा हा प्रयत्न आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी योजनांचा व्यापक प्रचार-प्रसार करणे हे जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रमुख काम आहे. वृद्धाश्रमातील नागरिकांसोबत वेळ घालवून मनमोकळ्या गप्पा मारल्या की त्यांच्या सुख-दुःखांची देवाणघेवाण करता येते आणि अशा उपक्रमांतून त्यांना आपलेपणाची जाणीव होते, असे त्यांनी सांगितले.

माय भारतचे उपसंचालक सौरभ निशाद यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात माय भारत कार्यालयाची भूमिका काय आहे, हे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे ते म्हणाले. पालकांवर म्हातारपणी वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रत्येकाने आई-वडिलांची काळजी घेण्याचा संकल्प करावा, तसेच तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सेंट झेवियर्स हायस्कूलच्या समन्वयक आफरीन मॅडम यांनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमादरम्यान सेंट झेवियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी गाणी सादर केली. विद्यार्थिनी प्रती उषा हिने गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. अंजु निमसरकर यांनीही 'मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे...' हे गीत गायले. गीत-संगीत आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सिव्हिल लाईन, गोंदिया येथील सावली निवारा वृद्धाश्रमाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजु निमसरकर यांनी केले. सूत्रसंचालन उपसंपादक कैलाश गजभिये यांनी केले, तर तुषार उरकांदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सावली निवारा केंद्राचे प्रमुख लोकेश पटले आणि माय भारत कार्यालयाचे प्रविण हेडाऊ यांनी परिश्रम घेतले. वृद्धाश्रमातील नागरिकांसह सेंट झेवियर्स हायस्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ