गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
14:25 IST

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम, पुण्यात आंदोलनाचा आठवा दिवस

गरवारे महाविद्यालयाजवळील एस. एम. जोशी पुल परिसरात सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभारात शुद्धीकरण आणि परीक्षांमध्ये पारदर्शकतेची मागणी केली.

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम, पुण्यात आंदोलनाचा आठवा दिवस छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा गुरुवारी आठवा दिवस होता. गरवारे महाविद्यालयाजवळील एस. एम. जोशी पुल परिसरातच हे आंदोलन आजही सुरू राहिले. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनावर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. आयोगाच्या कारभारात शुद्धीकरण व्हावे आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. याच दरम्यान महाज्योतीच्या परीक्षेतील गोंधळावरून मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलनात पुढे आली.

आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि एमपीएससीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोठा आर्थिक संघर्ष करावा लागतो, असे त्यांनी सांगितले. परीक्षा प्रक्रियेतल्या गैरप्रकारांचा सगळ्यात जास्त फटका याच विद्यार्थ्यांना बसतो, असेही ते म्हणाले. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये सामान्यीकरणाची (नॉर्मलायझेशन) पद्धत नको, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.

महाज्योतीच्या परीक्षेच्या वेळी नांदेड, पुणे अशा ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्या आणि गोंधळ झाला, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ही परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी आणि संबंधित केंद्रे काळ्या यादीत टाकावीत, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. महाज्योतीचे विद्यार्थी आंदोलनात उतरले, तर त्यांच्या मागण्यांमध्ये अतुल सावे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचाही समावेश करण्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.

टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराचा मुद्दाही आंदोलनस्थळी उपस्थित करण्यात आला. याआधी टीईटी गैरप्रकाराचा तपास झाला होता. पण त्यानंतर घडलेल्या गोष्टींबाबत सरकारने ठोस कारवाई केली का, असा सवाल आंदोलकांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडेही सरकारने गांभीर्याने पाहावे, अशीही मागणी झाली. नांदेड, जालना, पुणे, नागपूर, अहिल्यानगरसह विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी बोलून दाखवला.

आयोगाच्या अध्यक्षांची प्रतिकात्मक तिरडी आधी जाळण्यात आली होती. बुधवारी त्याची राख सावडण्याचा कार्यक्रम आंदोलनस्थळी झाला. विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करून आपले दुःख व्यक्त केले.

विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, "मी स्वतः एमपीएससीचा विद्यार्थी राहिलो आहे. विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, ऑब्जेक्टिव्ह पद्धतीत पारदर्शकता राहावी, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांचा आवाज विधिमंडळात मांडू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांचे प्रश्न निश्चित सोडवतील. आगामी अधिवेशनातही त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही पुढाकार घेऊ."

माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी आहे. ते कायम विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. एमपीएससीच्या प्रश्नासाठी आयुक्त व्हि. राधा यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली असून तिचे काम सुरू आहे. सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास आहे. मात्र, रोहित पवार यांच्यासारखे नेते विद्यार्थ्यांना भरकटवून राजकीय वापर करत आहेत, ते त्यांनी थांबवावे."

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ