एमपीएससी आंदोलनस्थळी राज ठाकरे: विद्यार्थ्यांना पाठिंबा, ७० हजार पदभरती होणार नसल्याचे वक्तव्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. तिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले. आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हे आंदोलन आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचा दावा केला जात आहे. आंदोलनस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, असे आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
राज ठाकरे म्हणाले, की विद्यार्थ्यांचे प्रश्न ज्या ज्या मार्गाने सुटू शकतात, त्या मार्गाने सोडवले पाहिजेत. महाराष्ट्रातील मराठी मुलामुलींना नोकरी लागावी म्हणून राज ठाकरेला कोणाचे पाय धरावे लागले, तरी राज ठाकरे धरायला तयार आहे, असे ते म्हणाले. मात्र तुम्ही गैरसमजात राहू नका, भलत्या स्वप्नांत राहू नका, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
राज ठाकरे यांनी सांगितले, की तुमच्या मागण्या मी पाहिल्या आणि ७० हजार पदभरतीचा मुद्दा वाचला. ही पदभरती होणार नाही, हे आत्ताच लक्षात ठेवा, असे ते म्हणाले. रोहित पवार तिथे बसलेले आहेत, असा उल्लेख करून त्यांनी म्हटले, की दुसरे सरकार आले तरी हे होऊ शकत नाही. परिस्थिती आणि वस्तुस्थिती समजून घ्या, पण नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, असेही ते म्हणाले. गेल्या २५ वर्षांपासून आपण सांगतोय, की राज्यातील तरुणांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.
आरक्षणाचा मुद्दा काढत राज ठाकरे म्हणाले, की आपण आरक्षण पाहिजे म्हणतो, पण आरक्षणासाठी सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? जे काही चाललंय ते खासगी होत चाललंय आणि खासगी क्षेत्रात आरक्षण नाही, असे त्यांनी म्हटले. हे सगळं सरकारी धोरणांमुळे होतंय, असे त्यांचे म्हणणे होते.
विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, की तुमचा विचारच केला जात नाही, तुम्हाला गृहीत धरले जातंय. निवडणुका आल्या की पैसे वाटा, दारू पाजा आणि निवडून या, असे चालते, असे राज ठाकरे यांनी म्हटले. या लोकांचा गैरसमज तुम्ही जोपर्यंत दूर करणार नाही, तोपर्यंत आयुष्यात तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही, असे ते म्हणाले.
तुम्ही दबाव निर्माण केला पाहिजे, असे सांगून राज ठाकरे म्हणाले, की तुमचं म्हणणं ऐकल्याशिवाय काही खरं नाही, अशी धास्ती या खासदार आणि आमदारांमध्ये निर्माण झाली, की बघा कसे सुतासारखे सरळ येतात.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.