नागपुरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि नशेवर बंदी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा आदेश
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि नशेशी संबंधित हालचालींना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी आदेश काढले आहेत.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस), 2023 च्या कलम 163 नुसार नांगरे पाटील यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि नशेचे पदार्थ घेण्यावर बंदी घालणारे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश 6 ऑक्टोबर रोजी काढण्यात आला असून तो 6 डिसेंबर 2026 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहील, म्हणजेच तोपर्यंत हे निर्देश पाळावे लागतील.
या आदेशाच्या कक्षेत हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, बार तसेच शाळा-कॉलेजच्या कॅन्टीनसह इतर सार्वजनिक ठिकाणे येतील. या ठिकाणांच्या चालकांना आपल्या परिसरात सहज दिसेल अशा जागी धूम्रपानास मनाई असल्याचा स्पष्ट फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे आणि इतर संबंधित आस्थापनांमध्ये गरजेनुसार महिला आणि पुरुष सुरक्षा कर्मचारी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ग्राहकांशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच कोणतीही संशयास्पद किंवा गंभीर घटना घडल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
अधिसूचनेत स्पष्ट म्हटले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, 2023 मधील संबंधित कलमांनुसार कारवाई केली जाईल. पोलिसांच्या या आदेशामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानासोबतच हुक्का आणि नशेचे पदार्थ घेण्याबाबत हॉटेल आणि कॅफे चालकांची जबाबदारी वाढली आहे.
ज्या आस्थापनांमध्ये कायद्यानुसार ग्राहकांना धूम्रपानाची परवानगी आहे, तिथे स्वतंत्र निर्धारित धूम्रपान क्षेत्र (डेसिग्नेटेड स्मोकिंग एरिया) तयार करावे लागेल. हे क्षेत्र सामान्य ग्राहकांच्या बसण्याच्या किंवा जेवणाच्या जागेपासून पूर्णपणे वेगळे असले पाहिजे.
तसेच 'नो स्मोकिंग'चे फलक लावणे आणि धूम्रपानाशी संबंधित नियमांचे पालन होईल याची खात्री करणे ही आस्थापना मालकाची जबाबदारी असेल. नांगरे पाटील यांच्या आदेशात आस्थापनांच्या परिसरात अमली पदार्थांचे सेवन होऊ न देण्याचेही निर्देश दिले आहेत.
ग्राहकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर, पार्किंगमध्ये तसेच इतर संवेदनशील ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि त्यांचे रेकॉर्डिंग किमान 15 दिवस जपून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.