सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:54 IST

स्टारलिंकवर युक्रेनच्या वापराला आळा; अटींचे उल्लंघन झाल्याचा मस्क यांचा आरोप

युक्रेनच्या सैन्याने स्टारलिंकच्या सेवा अटी मोडल्याचा आरोप इलॉन मस्क यांनी केला आहे. सेवा बंद झाल्याने युक्रेनच्या लष्करी कारवायांवर परिणाम झाला होता.

स्टारलिंकवर युक्रेनच्या वापराला आळा; अटींचे उल्लंघन झाल्याचा मस्क यांचा आरोप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धात इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या उपग्रह इंटरनेट सेवेवरून नवा वाद सुरू झाला आहे. स्पेसएक्सचे प्रमुख असलेल्या मस्क यांनी युक्रेनच्या सैन्यावर स्टारलिंकचे नियम व अटी मोडल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्टारलिंक ही नागरी इंटरनेट सेवा आक्रमक ड्रोन हल्ल्यासाठी वापरली गेली. त्यामुळे युक्रेनच्या स्टारलिंक वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

युद्धादरम्यान युक्रेनमधली स्टारलिंक इंटरनेट सेवा अचानक बंद झाली आणि जगभर त्याची चर्चा सुरू झाली. विश्लेषक वेगवेगळे अंदाज बांधत असतानाच मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून खुलासा केला. युक्रेनच्या सैन्याने स्टारलिंकच्या सेवा अटींचे उल्लंघन केले, असे त्यांनी म्हटले. स्टारलिंक ही व्यावसायिक आणि नागरी इंटरनेट सेवा आहे आणि लोकांना ठार मारण्यासाठी तिचा वापर करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

विशेषतः ड्रोन हल्ल्यांमध्ये या सेवेचा वापर झाल्याचे मस्क यांनी सांगितले. या सेवेचा वापर करून माणसांना मारण्याची परवानगी युक्रेनला कधीही दिली नव्हती, असे त्यांनी म्हटले. या वापरासाठी असलेली तांत्रिक पळवाट बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात स्टारलिंकने सेवा बंद केल्यानंतर युक्रेनच्या सैन्याला अडचणींना तोंड द्यावे लागले. वेगाने फिरणारे ड्रोन आणि लष्करी उपकरणे यांच्या संपर्क व्यवस्थेवर परिणाम झाला. सैनिकांमधला संवाद, लष्करी रसद आणि रशियन ड्रोन हल्ल्यांना उत्तर देण्याची क्षमता यावरही त्याचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

या दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी २४ ऑक्टोबर रोजी स्टारलिंक आणि स्टारशील्ड सेवा पूर्वीच्या वेगाने सुरू झाल्याचे जाहीर केले. युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनीही सेवा स्थिर झाल्याची माहिती दिली. मस्क यांनी स्पष्ट केले की स्टारशील्ड ही वेगळी लष्करी प्रणाली आहे आणि तिचे नियंत्रण अमेरिकन सरकारकडे आहे.

स्टारलिंक सेवा पूर्णपणे बंद झाल्यास युक्रेनची बाजू कमकुवत होऊन कोसळू शकते, असा इशाराही मस्क यांनी दिला आहे. या विधानामुळे युक्रेनच्या लष्करी हालचाली आणि अमेरिकेशी असलेले संबंध यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या युद्धात स्टारलिंकचा वापर करून युक्रेनने रशियाचे मोठे नुकसान केले आहे. तसेच इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात एकाच वेळी जवळपास १६० लहान मुले-मुली मारली गेली, तेव्हा मस्क यांची माणुसकी कुठे होती, ज्या माणुसकीच्या जोरावर ते आज युक्रेनवर आरोप करून नैतिकता दाखवत आहेत, असे प्रश्नही त्यांना विचारले जात आहेत.

आधुनिक युद्धात खासगी कंपन्यांच्या उपग्रह इंटरनेट सेवेचे महत्त्व आणि तिच्यावरील नियंत्रणाचा प्रश्न या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ