सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 10:02 IST

व्हर्जिनियात प्लास्टिक कचरा आणि जुन्या डांबरापासून बनवलेले सहा महामार्ग चाचणीत उत्तम

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात पुनर्वापर केलेले प्लास्टिक आणि जुन्या रस्त्यांचे डांबर वापरून बांधलेले सहा महामार्गांचे टप्पे प्राथमिक पाहणीत चांगल्या स्थितीत आढळले आहेत.

व्हर्जिनियात प्लास्टिक कचरा आणि जुन्या डांबरापासून बनवलेले सहा महामार्ग चाचणीत उत्तम छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

जगभरात रोज हजारो टन प्लास्टिक कचरा तयार होतो आणि तो निसर्गासाठी, पर्यावरणासाठी फार घातक ठरत आहे. या कचऱ्याचे करायचे काय, हा प्रश्न शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञांना भेडसावत आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील अभियंत्यांनी यावर एक उपाय शोधला आहे. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर तर होतोच, शिवाय रस्त्यांची मजबुती आणि आयुष्यही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

व्हर्जिनियातील सहा मुख्य राज्य महामार्गांवर पुनर्वापर केलेले प्लास्टिक आणि जुन्या रस्त्यांच्या डांबराचे मिश्रण वापरून रस्ते बांधले गेले. चाचणीदरम्यान हे रस्ते अतिशय चांगल्या स्थितीत आढळले आहेत. अभियंत्यांनी हा चाचणी प्रकल्प २०२२ आणि २०२३ या काळात सहा वेगवेगळ्या राज्य महामार्गांच्या टप्प्यांवर राबवला होता.

या प्रकल्पात प्लास्टिक कचरा आणि जुन्या रस्त्यांवरून काढलेले डांबर (Reclaimed Asphalt Pavement - RAP) वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून मिश्रण केले गेले आणि ते रस्त्यांच्या पृष्ठभागावर वापरले गेले. रस्ते वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर काही काळाने तज्ज्ञांनी पाहणी केली. तेव्हा या रस्त्यांची स्थिती पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या रस्त्यांपेक्षाही चांगली असल्याचे दिसून आले.

अत्यंत कठीण हवामान आणि रोजची अवजड वाहतूक यात हे नवे साहित्य आणि तंत्रज्ञान कसे टिकते, हे पाहणे हा चाचणीचा मूळ हेतू होता. काही टप्प्यांत ४० टक्क्यांपर्यंत जुने डांबर (RAP) वापरले होते. रस्ते खराब झाले किंवा त्यांची डागडुजी करायची झाली, तर सहसा जुना रस्ता उकरून ते साहित्य फेकून दिले जाते किंवा साठवून ठेवले जाते.

व्हर्जिनिया ट्रान्सपोर्टेशन रिसर्च कौन्सिलच्या (VTRC) संशोधकांनी मात्र या जुन्या डांबरावर विशेष प्रक्रिया करून ते नव्या मिश्रणात घातले. डांबरात विशिष्ट तापमानाला प्लास्टिक मिसळले की ते चिकटवून ठेवणाऱ्या घटकासारखे (बाइंडिंग एजंट) काम करते. त्यामुळे रस्त्यात पाणी कमी झिरपते, खड्डे पडण्याची शक्यता घटते आणि रस्त्याची वाहक क्षमता कैक पटीने वाढते.

कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, प्राथमिक पाहणीत सहाही विभागांची बाहेरून दिसणारी स्थिती अतिशय चांगली आणि खड्डेमुक्त आढळली. पृष्ठभागावर पडणारे तडे, घर्षण आणि वाहनांच्या वजनामुळे पडणारे खड्डे या सगळ्या बाबतीत प्लास्टिकच्या रस्त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.

संशोधकांनी मात्र हेही स्पष्ट केले आहे की हे निकाल सध्या प्राथमिक मूल्यांकनावर आधारित आहेत. कडक उन्हाळा, जोरदार बर्फवृष्टी आणि मुसळधार पाऊस अशा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये रस्ता दीर्घकाळ कसा टिकतो, हे पाहण्यासाठी आणखी काही वर्षे सतत निरीक्षण करावे लागेल. तरीही या सुरुवातीच्या यशामुळे जगभरातील रस्ते विकास प्राधिकरणे आणि नागरी अभियंत्यांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.

या तंत्रज्ञानाचा दुहेरी फायदा होतो. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर टाकाऊ वस्तू समुद्रात किंवा लँडफिलमध्ये साचून प्रदूषण पसरवतात. त्यांना रस्त्याच्या रूपाने दीर्घकाळ टिकणारी आणि सुरक्षित जागा मिळते. दुसरा फायदा म्हणजे रस्ते बांधणीसाठी लागणाऱ्या नैसर्गिक डांबराचा (Bitumen) वापर कमी होतो. त्यामुळे कच्च्या तेलावरील अवलंबित्व घटते आणि रस्ते बांधणीचा एकूण खर्चही खूप कमी होतो.

भारतासारख्या विकसनशील देशातही काही ठिकाणी प्लास्टिक रस्त्यांचे प्रयोग सुरू आहेत. व्हर्जिनियात जुने रस्ते आणि प्लास्टिक एकत्र वापरून हायवे दर्जाचे रस्ते यशस्वीपणे बांधले गेले आहेत, आणि ते जगभरातील महामार्ग प्राधिकरणांसाठी आदर्श मॉडेल ठरत आहे. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरला, तर पुढे जगभरातील रस्ते अधिक टिकाऊ, मजबूत आणि पर्यावरणपूरक होतील, यात शंका नाही.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ