सौदीत दोन बांगलादेशी नागरिकांना गुपचूप फाशी; आणखी 20 कैद्यांच्या शिक्षेबाबत अनिश्चितता
सौदी अरेबियात दोन बांगलादेशी नागरिकांना फाशी दिल्याचे समोर आले आहे. उर्वरित 20 दोषी कैद्यांच्या शिक्षेचा तपशील मात्र दिलेला नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
सौदी अरेबियात दोन बांगलादेशी नागरिकांना गुपचूप फाशी देण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर सौदीतील वेगवेगळ्या तुरुंगांत असलेल्या आणखी 20 बांगलादेशी कैद्यांचे काय होणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
सौदी प्रशासनाने बांगलादेशच्या दूतावासाला एक अधिकृत यादी दिली होती. त्या यादीत या कैद्यांच्या नावापुढे "दोषी" (Convicted) असे लिहिले आहे. पण त्यांना नेमकी कोणती शिक्षा झाली आहे, हे मात्र पूर्णपणे अस्पष्ट ठेवले आहे.
सौदीने 30 सप्टेंबर रोजी जेद्दाहमधील बांगलादेशी वाणिज्य दूतावासाला एकूण 2,461 बांगलादेशी कैद्यांची यादी दिली होती. ती नीट तपासल्यावर त्यातील 22 जणांच्या नावापुढे "दोषी" असा शब्द दिसला. विशेष म्हणजे निकालाचा सारांश, शिक्षेचा कालावधी आणि शिक्षेचे स्वरूप सांगणारे रकाने रिकामेच सोडले होते. या 22 पैकी दोघांना आधीच फाशी झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उरलेल्या 20 जणांनाही गुपचूप फाशी दिली जाईल का, अशी भीती बांगलादेश सरकार आणि कैद्यांच्या कुटुंबीयांना वाटत आहे.
फाशी देण्यात आलेल्यांची नावे नझरुल इस्लाम आणि स्वीटी अख्तर अशी आहेत. त्यांच्या नावांचा समावेश सौदीने पाठवलेल्या प्राथमिक यादीतही होता. पण कोणतीही पूर्वसूचना न देता आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून त्यांना फाशी दिल्याची बातमी पसरली. त्यामुळे बांगलादेशात तीव्र संताप आहे. कोणत्याही नागरिकाला मृत्युदंड सुनावण्याआधी आणि त्याची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित देशाच्या दूतावासाला अधिकृत माहिती का दिली नाही, असा थेट सवाल बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
सुरुवातीच्या वृत्तांत नझरुल आणि स्वीटी हे पती-पत्नी असल्याचे म्हटले होते. मक्का येथील पवित्र मशिदीच्या परिसरात अनैतिक कृत्य केल्याचा गंभीर आरोप सौदी पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला होता. पण त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप ठामपणे फेटाळले आहेत. दोघांमध्ये वैवाहिक नाते नव्हते, ते सौदीतील एकाच सफाई कंपनीत (Al-Majal Company) काम करत होते, असे नातेवाइकांनी सांगितले.
नझरुलच्या कुटुंबीयांचा दावा आहे की कामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून एका सहकाऱ्याने त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याला चुकीच्या प्रकरणात अडकवले. स्वीटीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार कामाच्या ठिकाणच्या वादानंतर तिला ऑगस्ट 2023 मध्ये अटक झाली होती. खटल्यादरम्यान दोघांनाही बाजू मांडण्यासाठी वकील मिळाला नाही आणि निष्पक्ष सुनावणीची संधीही दिली गेली नाही, असा गंभीर आरोप दोन्ही कुटुंबांनी केला आहे.
सौदी प्रशासनाच्या माहितीनुसार या 22 बांगलादेशी नागरिकांवर गंभीर गुन्हे आहेत. त्यापैकी 8 जणांवर खुनाचा आरोप आहे आणि 5 जणांवर अमली पदार्थांच्या तस्करीचा. आणखी 5 जणांवर वैयक्तिक हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप आहे. 2 प्रकरणे सौदी कायद्याच्या उल्लंघनाची आहेत, 1 सायबर गुन्ह्याचे आणि 1 व्यभिचाराचे आहे. हे कैदी जेद्दाहमधील धाहबान तुरुंग, शुमैसी तुरुंग, जेद्दाह मध्यवर्ती तुरुंग, तसेच नजरान, खमिस, अल-बाहा, हादा आणि जेद्दाह येथील महिला कारागृहात आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जेद्दाहमधील बांगलादेशच्या महावाणिज्य दूतावासाने सौदी अधिकाऱ्यांकडे तातडीने स्पष्टीकरण मागितले आहे. 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेश दूतावासाने सौदी परराष्ट्र मंत्रालयाच्या जेद्दाह शाखेला अधिकृत मुत्सद्दी पत्र (Diplomatic Note) पाठवले. त्यात सर्व दोषी कैद्यांच्या खटल्यांचा पूर्ण तपशील, निकालाची प्रत आणि दिलेल्या शिक्षेची अचूक माहिती मागितली आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आणि व्हिएन्ना कराराच्या (Vienna Convention) नियमांनुसार परदेशी नागरिकावर कारवाई करताना किंवा त्याला शिक्षा सुनावताना त्याच्या देशाच्या दूतावासाला कळवणे बंधनकारक असते. सौदीने ही माहिती दिली नसल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. सध्या बांगलादेश सरकार सौदीच्या अधिकृत उत्तराची वाट पाहत आहे आणि आपल्या नागरिकांना कायदेशीर मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.