मुंबईत तीन नवे पूल सुरू; '५९ मिनिटांत मुंबई'चे लक्ष्य जवळ आल्याचा फडणवीसांचा विश्वास
विद्याविहार, शीव आणि गोरेगाव पूर्व येथील तीन पुलांचे लोकार्पण वर्षा निवासस्थानातून ऑनलाईन झाले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा वेगाने उभ्या राहत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या कामांमुळे ' ५९ मिनिटात मुंबई ' हा संकल्प पूर्ण होणे दृष्टिपथात आले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या 'मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी'च्या कामामुळे संपर्क जोडणी वेगवान होईल आणि नागरिकांच्या 'इज ऑफ लिविंग'मध्ये कमालीची सुधारणा होईल, असेही फडणवीस म्हणाले.
वर्षा निवासस्थानी फडणवीस यांच्या हस्ते तीन पुलांचे ऑनलाईन लोकार्पण झाले. यात मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लालबहादूर शास्त्री मार्ग आणि रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा रेल्वेपूल, शीव रेल्वेस्थानकावरील उड्डाणपूल आणि गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरीपर्यंतचा उड्डाणपूल यांचा समावेश आहे. कार्यक्रमाला पुण्यातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार हेही होते. विद्याविहार येथील कार्यक्रमात आमदार राजहंस सिंह, पराग शहा, महापौर रितु तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्यासह लोकप्रतिनिधी हजर होते.
फडणवीस म्हणाले, की मुंबई महानगरात उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अखंड संपर्कव्यवस्था उभी केली जात आहे. तिन्ही पूल धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुलभ होईल. पूर्व-पश्चिम संपर्कासाठी गोरेगाव मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. विद्याविहार स्थानकावरील पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या भागातला प्रवास आधी सुमारे ३० मिनिटांचा होता, तो आता १० मिनिटांत होईल. त्यामुळे घाटकोपर स्थानकावरील उड्डाणपुलावरचा वाहतुकीचा भारही कमी होईल.
गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शन परिसरातील उड्डाणपूल आणि उन्नत गोलाकार रस्ता प्रकल्पाची रचना प्रभावी पद्धतीने केली आहे. त्यामुळे या जंक्शनवरची आणि जवळच्या चौकांतली वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होईल. शीव रेल्वे स्थानकावरील जुना पूल ११२ वर्षांचा आणि असुरक्षित झाला होता. नवीन पुलामुळे वाहतुकीला फायदा तर होईलच, शिवाय पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे काम हाती घेता येईल. त्या पूर्ण झाल्यावर लोकलची संख्या आणि वारंवारता वाढवता येईल आणि प्रवाशांना मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नवीन शीव पूल पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाला पश्चिमेकडील धारावी, वांद्रे आणि बीकेसी या भागांशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल, असे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका काँक्रीट रस्ते, कोस्टल रोड आणि इतर पायाभूत प्रकल्पांतून शहराची संपर्कव्यवस्था वेगाने वाढवत आहे, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, की महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या समन्वयातून अनेक मोठे प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत. तिन्ही स्तरांवरील यंत्रणांच्या समन्वयामुळे कामे वेळेत होत आहेत. त्यांनी मनपा प्रशासन, अभियंते, कंत्राटदार, अधिकारी आणि कामगारांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजित बांगर आणि मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे हेही यावेळी उपस्थित होते.
शीव येथील ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाला होता. शिवाय मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान ५ व्या व ६ व्या मार्गिकेच्या विस्तारासाठी त्याची पुनर्बांधणी हाती घेतली गेली. त्यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान होईल. हा शीव पूर्व आणि शीव पश्चिम यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. प्रकल्पाचा खर्च रेल्वे भागासाठी ३३.५१ कोटी रुपये आणि पोहोच रस्त्यासाठी ३१.६२ कोटी रुपये आहे. पुलाचे काम अंदाजे ४ महिने आधी पूर्ण झाले. रेल्वे पुलाची एकूण लांबी ५४.५ मीटर आणि रुंदी २६ मीटर आहे. त्यासाठी ४९६ टन वजनाचे २ 'सेमी थ्रू स्टील गर्डर' वापरले आहेत. पोहोच रस्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडच्या दिशेने ६५ मीटर, धारावीच्या दिशेने ११० मीटर आणि एल.बी.एस. रोडच्या दिशेने ९७ मीटर आहे. एल.बी.एस. मार्ग व संत रोहिदास मार्गावर पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग केले आहेत. जमिनीला मजबुती देण्यासाठी 'टच पाईल्स'चा वापर केला आहे.
विद्याविहार पूल बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधला असून घाटकोपर स्टेशनजवळच्या उड्डाणपुलावरचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. काम दोन टप्प्यांत झाले. पहिल्या टप्प्यात रेल्वे हद्दीतील सेवांची पुनर्स्थापना झाली आणि ९९.३४ मीटर लांबीच्या दोन तुळ्या बसवल्या. दुसऱ्या टप्प्यात पूर्व व पश्चिम बाजूंचे प्रत्येकी ५०० मीटर लांब सेवारस्ते बांधले. पुलाची एकूण लांबी ६०० मीटर असून रुंदी १५.५० ते १७.५० मीटर आहे. पूर्वेकडील आर. सी. मार्ग आणि पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्ग यांमधला प्रवास ३० मिनिटांवरून अंदाजे १० मिनिटांवर येणार आहे.
गोरेगाव पूर्वेतील उड्डाणपूल १.२६ किमी लांबीचा, सहा मार्गिकांचा आहे. तो पूर्वनिर्मित बॉक्स आकाराच्या काँक्रीट सेगमेन्टचा आहे. पी ७ ते पी ११ दरम्यान वक्राकार पोलादी स्पॅन आहे. जीएमएलआर प्रकल्पांतर्गत हा पूल पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उभारला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत सहज पोहोच मिळेल. ए. के. वैद्य मार्ग, फिल्म सिटी रोड आणि हॉटेल रत्नागिरी जंक्शन परिसरातील मोठी वाहतूक कोंडीही दूर होईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.