नाशिकमध्ये मतदार यादीतून वगळलेल्यांना पुन्हा नाव नोंदवण्याची संधी, मतदारांच्या उदासीनतेमुळे बीएलओंपुढे पेच
प्रारूप यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना पुरावे सादर करून नाव पुन्हा समाविष्ट करता येणार आहे, मात्र शिबिरांना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नाशिक जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीतून नावे वगळलेल्या मतदारांना पुरावे सादर करून पुन्हा यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे. तरीही बहुतांश मतदार याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष सखोल पुनरिक्षण म्हणजेच एसआयआर मोहिमेचा जिल्ह्यात सध्या दुसरा टप्पा सुरू आहे आणि या टप्प्यात प्रशासनासमोर मोठा पेच उभा राहिला आहे.
नावे वगळलेल्या मतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आणि विशेष शिबिरेही घेण्यात आली. हे दोन्ही उपाय करूनही मतदार प्रतिसाद देत नसल्याने आपले काम पूर्ण कसे करायचे, असा प्रश्न बीएलओंपुढे उभा राहिला आहे.
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत मिळून तब्बल १० लाख २७ हजार मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. स्थलांतर, मृत्यू आणि दुबार नोंदणी अशी विविध कारणे त्यामागे आहेत. मात्र यातील अनेक मतदारांचे आक्षेप किंवा पुरावे तपासल्याशिवाय त्यांची नावे यादीतून कायमस्वरूपी वगळता येणार नाहीत. म्हणूनच निवडणूक आयोगाने या मतदारांना आवश्यक पुरावे देऊन यादीत पुन्हा येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
जिल्हा प्रशासन गेल्या एक महिन्यापासून मतदारसंघनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय विशेष शिबिरे घेत आहे. शनिवारी आणि रविवारी बीएलओंनी मतदान केंद्रावर हजर राहावे, असे आदेश आहेत. तेथे त्यांनी नवमतदारांची नोंदणी करायची, पत्त्यात किंवा नावात दुरुस्ती करायची आणि नोटीस बजावलेल्या मतदारांची कागदपत्रे तपासायची आहेत. आवश्यक पुरावे सादर करून नाव समाविष्ट करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत शेवटची मुदत राहणार आहे.
प्रत्यक्षात मात्र शिबिरांना अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी शहरात झालेल्या शिबिरातही फारसे मतदार फिरकलेच नाहीत. वारंवार फोन करूनही आणि घरी जाऊन संपर्क साधूनही मतदार प्रतिसाद देत नसल्याची कैफियत बीएलओंनी मांडली आहे. दुसरीकडे, एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, अशा पद्धतीने काम करण्याच्या कडक सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
याच शिबिरांच्या माध्यमातून १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र तरुणांनाही मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ६५ हजार नवीन मतदारांनी नमुना ६ भरून आपली नोंदणी पूर्ण केली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.