चेर्नोबिलच्या किरणोत्सारी भागात सोडलेले ३१ जंगली घोडे वाढून १३७ वर पोहोचले
माणसाने सोडलेल्या चेर्नोबिलच्या बंदी क्षेत्रात १९९८ मध्ये सोडलेल्या प्रझेवाल्स्की घोड्यांनी तिथे स्वतःची वस्ती उभी केल्याचे कॅमेरा ट्रॅपच्या नोंदींतून दिसले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एप्रिल १९८६ मध्ये तत्कालीन सोव्हिएत रशियातील (आजचा युक्रेन) चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात मोठा स्फोट झाला. मानवी इतिहासातला सर्वात मोठा आणि विनाशकारी अणु-अपघात म्हणून त्याची नोंद आहे. त्यानंतर बाहेर पडलेल्या किरणोत्सर्गामुळे (Radiation) हजारो लोकांना एका रात्रीत घरदार सोडून निघावे लागले. शेकडो मैलांचा परिसर माणसांना राहण्यासाठी पूर्णपणे बंद करून Exclusion Zone म्हणून जाहीर करण्यात आला. ज्या ठिकाणी माणसाने पाऊल ठेवणेही जिवावर बेतू शकते, तिथेच आज निसर्गाने असे काही करून दाखवले आहे, ज्याची कल्पना कुठल्याही शास्त्रज्ञाने केली नव्हती.
१९९८ आणि १९९९ च्या दरम्यान अस्कानिया-नोव्हा बायोस्फीअर रिझर्व्हने (Askania-Nova Biosphere Reserve) चेर्नोबिलच्या या बंदी क्षेत्रात प्रझेवाल्स्की (Przewalski) जातीचे ३१ जंगली घोडे सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. निसर्गाचा समतोल राखावा आणि त्या भागात जैविक पुनर्रचना व्हावी, हा त्यामागचा हेतू होता. प्रझेवाल्स्की ही जगातली शेवटची खरीखुरी जंगली घोड्यांची जात मानली जाते. मोकळ्या गवताळ प्रदेशात आणि कठीण हवामानात टिकून राहण्याची त्यांची ताकद वेगळीच असते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ही जात नामशेष होण्याच्या वाटेवर होती.
या ३१ घोड्यांपैकी १० नर आणि १८ माद्या अस्कानिया-नोव्हाहून आणल्या होत्या, तर बाकीचे ३ घोडे एका स्थानिक प्राणिसंग्रहालयातून आले होते. धोकादायक वातावरणात थेट सोडण्याआधी त्यांना काही महिने बंदिस्त जागेत ठेवून तिथल्या हवामानाची सवय करून देण्यात आली. अनेक संशोधकांचा अंदाज होता की किरणोत्सर्ग आणि खाण्याची वानवा यांमुळे हे घोडे टिकणार नाहीत.
सुरुवातीचे दिवस या घोड्यांसाठी कठीण गेले. एका वैज्ञानिक शोधनिबंधानुसार तिथे आल्यावर काही महिन्यांतच ८ घोडे मरण पावले. उरलेल्या घोड्यांनी मात्र जुळवून घेतले आणि प्रजनन सुरू केले. २००३-२००४ पर्यंत त्यांची संख्या ६५ वर गेली. ही वाढ पाहून २००४ मध्ये प्राणिसंग्रहालयातून आणखी १३ घोडे आणण्यात आले, पण ते तिथल्या वातावरणात टिकले नाहीत आणि एकही पिल्लू मागे न ठेवता मरण पावले.
२००७ पर्यंत कळपाची संख्या पुन्हा घसरून ३० ते ४० च्या आसपास आली. यावेळी मृत्यूला कारण किरणोत्सर्ग किंवा लांडग्यांचे हल्ले नव्हते, तर बेकायदेशीर शिकार करणाऱ्या माणसांच्या टोळ्या (Poachers) होत्या.
तरीही हे घोडे तग धरून राहिले. सर्गेई गाशचक आणि सर्गेई पास्केविच या संशोधकांनी Theriologia Ukrainica या वैज्ञानिक पत्रिकेत आपला अभ्यास प्रसिद्ध केला आहे. चेर्नोबिलच्या २,६०० चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ७२० चौरस किलोमीटर भागात त्यांनी कॅमेरा ट्रॅप (Camera Traps) लावले होते. त्यांच्या नोंदींचे विश्लेषण केल्यावर दिसले की २०१८ पर्यंत युक्रेनच्या हद्दीत किमान १३७ प्रझेवाल्स्की घोडे निरोगी आणि मोकळे जीवन जगत होते. त्यात ४७ प्रौढ नर, ६६ माद्या आणि २४ लहान शिंगरे (Foals) होती. ज्या भागाचे सर्वेक्षण झाले नाही, तिथे ही संख्या आणखी जास्त असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संशोधकांना आणखी एक गोष्ट आढळली. काही घोड्यांनी प्रिपीयात (Pripyat) नदी ओलांडून बेलारूसच्या हद्दीत प्रवेश केला असून तिथे त्यांनी नवे प्रजनन गट तयार केले आहेत.
या प्रयोगातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. माणसांचा हस्तक्षेप, प्रदूषण, शहरीकरण आणि रस्त्यांची कामे थांबल्यामुळे निसर्ग स्वतःला पुन्हा उभा करू लागला आहे. तिथे किरणोत्सर्गाचा धोका अजूनही आहे, पण माणसांची वर्दळ नसल्यामुळे मिळालेले निर्भय वातावरण या प्राण्यांच्या वाढीला फायद्याचे ठरले आहे. माणसाने केलेल्या विनाशाच्या खुणांवरही जीवन पुन्हा फुलू शकते, हेच यातून दिसते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.