रविवार, 11 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:56 IST

माणगावचे शंतनु कुवेसकर यांची रायगडच्या मानद वन्यजीव रक्षकपदी निवड

माणगावचे शंतनु कुवेसकर यांची रायगडच्या मानद वन्यजीव रक्षकपदी निवड छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

माणगावचे वन्यजीव अभ्यासक, निसर्ग छायाचित्रकार आणि माहितीपट निर्माते शंतनु कुवेसकर यांची रायगड जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी (Wildlife Warden) नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत ही नियुक्ती करण्यात आली. रायगड जिल्ह्याची समृद्ध जैवविविधता जपण्यासाठी, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत.

वन्यजीवांचा अभ्यास, जनजागृती, बचावकार्य आणि निसर्ग संवर्धन या त्यांच्या दीर्घकाळच्या कामाला या नियुक्तीमुळे शासनाकडून ओळख मिळाली आहे, तसेच अधिकृत स्वरूपाची नवी जबाबदारीही आली आहे. माणगावसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जंगल, डोंगररांगा, नद्या, खाडीक्षेत्र, समुद्रकिनारे आणि ग्रामीण परिसर यांतील जैवविविधतेचा कुवेसकर सातत्याने अभ्यास करतात. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी जिल्ह्यात विविध वन्यजीव आणि पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत.

रायगडचे पक्षीवैभव आणि जैवविविधता महाराष्ट्राबरोबरच भारतभर आणि जगभरात पोहोचवण्यात कुवेसकर यांच्या छायाचित्रणाचा आणि अभ्यासाचा मोठा वाटा आहे. शाळेत असल्यापासून ते पर्यावरणाच्या कामाशी जोडलेले आहेत. रायगडमधील तरुण आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये निसर्ग व वन्यजीव संवर्धनाबद्दल जागृती करण्याचे काम त्यांनी केले आहे.

निसर्ग छायाचित्रण, पक्षीनिरीक्षण, निसर्गभ्रमंती, पर्यटन, माहितीपट आणि लेखन या माध्यमांतून त्यांनी रायगडची जैवविविधता जगासमोर मांडली. माणगाव तालुक्यात वन्यजीव बचावाच्या ज्या घटना घडतात, त्यात कुवेसकर नेहमी सक्रिय असतात. वन्यजीव कायद्यानुसार सर्वोच्च संरक्षण मिळालेल्या प्रजाती, मगर, अजरग, पिसोरी हरीण, खवले मांजर, वाघाटी यांसारखे वन्यप्राणी आणि अनेक पक्षी प्रजाती यांच्या बचावकार्यात त्यांनी वनविभाग आणि स्थानिक नागरिकांसोबत काम केले आहे.

रायगडच्या किनारपट्टीपासून सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत वेगवेगळ्या अधिवासांत आढळणाऱ्या अनेक वन्यजीवांचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. काळ नदी परिसरातील पाणमांजरांच्या वर्तनाचा अभ्यास ते दहा वर्षांपेक्षा जास्त काळ करत आहेत. महाधनेश पक्ष्यांच्या विणीच्या हंगामाचा सखोल अभ्यासही ते रायगड जिल्ह्यातून गेली १५ वर्षे करत आहेत.

रायगडमध्ये हिवाळ्यात स्थलांतर करून येणारी हिमालय ग्रिफन गिधाडे, अनेक प्रकारच्या घुबड प्रजाती, शिकारी पक्षी, स्थलांतरित पक्षी, साप, फुलपाखरे आणि कीटक पतंग यांच्या अनेक प्रजातींची जिल्ह्यातील पहिली नोंद कुवेसकर यांनी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून केली आहे.

वन्यजीव छायाचित्रण हे त्यांच्या कामाचे आणखी एक महत्त्वाचे माध्यम आहे. त्यांच्या छायाचित्रांमधून रायगडच्या जंगलातील पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक आणि वेगवेगळे अधिवास पाहायला मिळतात. ई-छायाचित्र प्रदर्शनात तसेच रायगडमधील वृत्तपत्रांत त्यांची शेकडो छायाचित्रे आणि पक्षी व निसर्ग संवर्धनावरचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.

सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमे आज वन्यजीव संवर्धनासाठी प्रभावी व्यासपीठ ठरली आहेत, असे शंतनु कुवेसकर नेहमी सांगतात. या माध्यमांतून स्थानिक जैवविविधतेची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणे आणि निसर्गाविषयी आस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

रायगड जिल्ह्यात निसर्ग पर्यटन सुरू करणाऱ्या पथप्रदर्शकांपैकी (पायोनिर) एक म्हणून कुवेसकर यांची ओळख आहे. व्यावसायिक पातळीवर निसर्गसहली, वन्यजीव आणि पक्षीनिरीक्षण सफारी यांसारखे उपक्रम राबवून त्यांनी देशभरातून आणि परदेशातूनही अनेक पर्यटकांना रायगडला बोलावले आणि इथल्या निसर्गसंपत्तीचे महत्त्व पटवून दिले.

निसर्ग पर्यटनाच्या व्यवसायातूनही वन्यजीवांचे संवर्धन आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण कसे शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पक्षीनिरीक्षण आणि छायाचित्रण मित्रांचे आयोजनही ते करत असतात.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ