युक्रेनचा रशियावर एका रात्रीत हजारावर ड्रोनचा हल्ला, सेंट पिटर्सबर्गमध्ये तेल डेपोला आग
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार हवाई संरक्षण यंत्रणेने एका रात्रीत १,०१५ युक्रेनी ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. रशियानेही युक्रेनच्या शहरावर हल्ले केले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध पुन्हा भडकले आहे. युक्रेनने रशियावर एक हजारांपेक्षा जास्त ड्रोन डागल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यामुळे रशियाला काही वेळासाठी काहीच कळेनासे झाले, असे सांगितले जाते.
या युद्धाची सुरुवात २०१४ मध्ये झाली होती. मात्र २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या सैन्याला युक्रेनवर पूर्ण ताकदीने हल्ला करण्याचे आदेश दिले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेचे युद्ध सुरू झाले. आज १८ ऑक्टोबर २०२६ रोजी या युद्धाला ४ वर्षे ७ महिने आणि २४ दिवस झाले आहेत, तरीही ते थांबायचे नाव घेत नाही.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई संरक्षण यंत्रणेने एका रात्रीत १,०१५ युक्रेनी ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. हे ड्रोन रशियाच्या विविध प्रदेशांत तसेच क्रिमिया आणि काळ्या समुद्राच्या परिसरात रोखण्यात आले. सेंट पिटर्सबर्गमध्ये झालेल्या या हल्ल्यात अनेक भागांत आग लागली. एवढ्या मोठ्या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे जवळपास तीन तेरा वाजले, असे मिळालेल्या माहितीवरून समजते.
या हल्ल्यात रशियातील तेल साठवण आणि निर्यात यांना लक्ष्य करण्यात आले. सेंट पिटर्सबर्ग परिसरातील तेल डेपोला आग लागल्याने रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांच्या संरक्षणाचे प्रश्न पुन्हा रशियासमोर उभे राहिले आहेत.
युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये सेंट पिटर्सबर्गमधील ऑइल टर्मिनल आणि रुची तेल डेपो यांना लक्ष्य करण्यात आले. तिथे आग लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. याशिवाय रशियातील रिटेल कंपनी ओझोनच्या लॉजिस्टिक सेंटरलाही आग लागली. VK या तंत्रज्ञान कंपनीच्या डेटा सेंटरवरही हल्ला झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे रशियाच्या ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दरम्यान, रशियानेही युक्रेनच्या शहरावर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा वर्षांच्या मुलीसह इतर नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. रशियाने या हल्ल्यावर जोरदार प्रतिहल्ला करण्याचे वचन युक्रेनला दिले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाकडून ऊर्जा सुविधांवर सातत्याने हल्ले होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात युक्रेनच्या ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रावर ७६ वेळा हल्ले झाले. त्यामुळे युद्धासोबतच अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील संबंधांतही तणाव निर्माण झाला असून दोन्ही देशांत एकमेकांबद्दल प्रचंड चीड आणि राग निर्माण झाला आहे.