सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 310 | Very Poor 19:39 IST

मुंबईत लोकल खोळंबली, भांडुपमध्ये लोकलच्या धडकेत 21 वर्षीय साहिल थिटेचा मृत्यू

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा 4 तासांहून अधिक काळ बंद होती, तर भांडुप स्टेशनजवळ एका तरुण प्रवाशाचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला.

मुंबईत लोकल खोळंबली, भांडुपमध्ये लोकलच्या धडकेत 21 वर्षीय साहिल थिटेचा मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल मार्गावर आज सकाळपासूनच गाड्या खोळंबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ठाणे ते सीएसएमटी या मार्गावर रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे लोकल सेवा तब्बल 4 तासांहून अधिक काळ बंद होती. ज्या ठिकाणी गाडी थांबली, तिथेच अनेक प्रवासी ट्रेन सोडून ट्रॅकवरून मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले.

सोमवारी सकाळी विक्रोळी आणि भांडुप दरम्यान सिग्नलिंग यंत्रणेच्या खोलीत अचानक आग लागली. त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची सेवा अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवरील लोकल अतिशय धीम्या गतीने धावत असून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.

सकाळपासून लोकल बराच वेळ खोळंबल्यामुळे प्रवासी तब्बल 3 ते 4 तास अडकून पडले आणि संतप्त झाले. भर उन्हात रुळावर उतरून चालण्याची वेळ त्यांच्यावर आली. कित्येक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून बाहेरचा रस्ता गाठला आणि सिटी बस, रिक्षा किंवा कॅबने प्रवास करून आपले ऑफिस गाठले.

याच गोंधळादरम्यान भांडुप स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवर भीषण दुर्घटना घडली. भांडुप स्टेशनजवळील 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून 3 नंबर प्लॅटफॉर्मवरील लोकल पकडण्यासाठी जात असताना एका प्रवाशाला लोकलची धडक बसली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव साहिल थिटे असून तो 21 वर्षांचा होता. साहिल मुलुंड कॉलनीमधील अमर नगर परिसरात राहत होता.

या घटनेनंतर प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. सकाळपासूनच लोकल खोळंबल्यामुळे प्रवासी आधीच त्रस्त झाले होते आणि त्यातच ही दुर्घटना घडल्याने त्यांची नाराजी आणखी वाढली आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या 4 पैकी 3 मार्गिकांवरील सिग्नल दुरुस्त करून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणारी धीमी मार्गिका मात्र अजून बाकी होती आणि तिचे कामही रेल्वे प्रशासनाकडून सुरू होते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ