भांडुप स्टेशनवर एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मध्य रेल्वेच्या खोळंब्यात नाहक बळी
मुलुंड आणि ठाणे स्टेशनदरम्यान तारा लटकल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झालेली असतानाच भांडुप स्टेशनवर एसी लोकलची धडक बसून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईत मध्य रेल्वेची लोकल सेवा आज विस्कळीत झाली आहे आणि त्यातच भांडुप स्टेशनवर एक दुर्दैवी घटना घडली. एसी लोकलची धडक बसून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून रेल्वे रूळ ओलांडत असताना या तरुणाला एसी लोकलची जोरदार धडक बसली. ही एसी लोकल मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जात होती. ही घटना धक्कादायक असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे.
धडक बसल्यानंतर तरुण जवळपास १५ ते २० मिनिटे फरफटत पुढे गेला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील कारवाई सुरू केली. मृत तरुणाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे या तरुणाचा नाहक बळी गेला, असे म्हणत आता संताप व्यक्त केला जात आहे.
खोळंब्याची पार्श्वभूमी अशी की, मुलुंड आणि ठाणे स्टेशनदरम्यान ओव्हरहेड केबल्सवरून तारा लटकलेल्या आढळल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला फटका बसला. मुलुंड आणि नाहूर दरम्यान प्रवासी रुळांवरून चालताना दिसले. त्यानंतर मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आणि गाड्या तब्बल १ ते २ तास उशिराने धावत आहेत.
सकाळी ९:२३ वाजता मुलुंड आणि ठाणे स्टेशनदरम्यान डाउन स्लो लाईनवरील ओव्हरहेड इक्विपमेंटची (OHE) वायर तुटली. त्याचबरोबर कांजूरमार्ग स्टेशनवर तसेच विक्रोळी आणि भांडुप दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. यामुळे सेंट्रल लाईनवरील लोकल १५ ते ६० मिनिटे उशिराने धावल्या आणि अनेक प्रवाशांना रुळांवरून प्रवास करावा लागला.
रेल्वे प्रशासनाने सकाळी १० वाजता वीजपुरवठा खंडित करून तारा हटवण्याचे काम सुरू केले होते. मात्र अद्याप वाहतूक कोलमडलेलीच आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.