बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:01 IST

सोमेश्वर कारखाना निवडणूक: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा सर्व २१ जागांवर विजयाकडे कल

सोमेश्वर कारखाना निवडणूक: सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा सर्व २१ जागांवर विजयाकडे कल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील 'सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल'ने एकतर्फी विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. सोमवारी (दि. १२) सायंकाळी सहा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवून कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजित दादा पवार सोमेश्वर विकास पॅनेल आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील 'श्री सोमेश्वर विकास पॅनेल' यांची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे जगताप यांच्या परिवर्तनाच्या दाव्याला मोठा धक्का बसला आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीला 'ब' वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे संग्राम सोरटे यांनी १३३ पैकी ९३ मते मिळवली आणि ॲड. महेश राणे यांचा पराभव केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाला वर्ष पूर्ण झालेले नसल्याने गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी टाळण्यात आली.

गट क्रमांक एकमधील नींबूत-खंडाळा मतदारसंघातून प्रमोद काकडे, अभिजित काकडे आणि डॉ. वसंतराव दगडे यांनी साडे आठ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. गट क्रमांक दोनमधील मुरूम-वाल्हे मतदारसंघात कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, विक्रम भोसले आणि ऋषिकेश गायकवाड यांनी ६ हजार ५७२ मतांच्या आघाडीने बाजी मारली. डॉ. दगडे यांना पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा पाठिंबा होता.

या निवडणुकीत ८४ टक्के मतदान झाले होते. कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती, पुरंदर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण या भागांत आहे. या निवडणुकीत ८३ उमेदवार रिंगणात होते. पुरुषोत्तम जगताप यांनी ऐनवेळी स्वतंत्र पॅनेल उभे केले, तर युगेंद्र पवार यांनीही स्वतंत्र आव्हान दिले. जगताप यांच्या पॅनेलला भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांनी पाठिंबा दिला होता. दुसरीकडे, आमदार विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलला साथ दिली.

निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी बारामतीत तळ ठोकून प्रचारयंत्रणा सक्रिय ठेवली होती. अजितदादांच्या रणनीतीचा अवलंब करत राष्ट्रवादीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोट बांधली. विरोधी पॅनेलचे पाच ते सहा उमेदवार विजयी होतील, असा अंदाज व्यक्त होत असतानाच मतमोजणीतील कल राष्ट्रवादीच्या बाजूने झुकला.

सायंकाळी सहा वाजेपर्यंत पहिल्या दोन गटांसह 'ब' वर्ग मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला होता. उर्वरित मतमोजणीला विलंब होत असल्याने प्रक्रिया मध्यरात्रीनंतरही सुरू राहण्याची शक्यता होती.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ