Baramati Crime: बारामती हादरले! गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार करून जीव घेतला; आरोपीचं क्रौर्य पाहून पोलीसही
पणदरे एमआयडीसी भागात गरोदर महिलेच्या घरात घुसून हातोड्याने हल्ला, लैंगिक अत्याचार आणि खून; माळेगाव पोलिसांनी दोन तासांत आरोपीला पकडलं.
पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातून एक अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. पणदरे एमआयडीसी भागात राहणाऱ्या एका गरोदर महिलेच्या घरात एक आरोपी जबरदस्तीने घुसला आणि त्याने तिच्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी अवस्थेत असतानाच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर गळा आवळून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव गणेश रामचंद्र माने (वय 26, राहणार पणदरे, ता. बारामती) असं आहे. अनैतिक आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने आरोपी जबरदस्तीने पीडित महिलेच्या घरात शिरला होता. महिलेच्या घरात घुसून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेनं याला कडाडून विरोध केला आणि आरोपीच्या कृत्याला तीव्र नकार दिला. मात्र या विरोधाला न जुमानता आरोपीने तिच्या डोक्यावर आणि मानेवर हातोड्याने सपासप वार केले.
हातोड्याचे वार बसताच पीडित महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि गंभीर जखमी झाली. मात्र आरोपीचं क्रूर कृत्य इथेच थांबलं नाही. महिला असहाय्य आणि गंभीर जखमी अवस्थेत पडलेली असतानाही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणालाही कळू नये आणि स्वतःचा बचाव व्हावा या हेतूने त्याने शेवटी गळा आवळून गरोदर महिलेचा खून केला.
खून केल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. लुटीच्या उद्देशाने त्याने मृत महिलेच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र आणि पायातील पैंजण चोरले आणि तिथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस स्टेशनचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि तपासाचं चक्र वेगानं फिरवलं. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयित गणेश माने याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, मृत महिलेचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला असून त्यात महिला गरोदर असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या अमानुष आणि क्रूर घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. गरोदर महिलेवर अशा पद्धतीने अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. माळेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.