मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही: साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना इशारा
कर्जत-भीमाशंकर परिसरातील साय डोंगरावरील वृक्षतोडीवरून वाद पेटला असून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कर्जत-भीमाशंकर परिसरातील साय डोंगरावरील वृक्षतोडीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रात जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात आहे, असा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या परिसरात हजारो झाडं तोडली जाणार, असा दावा केला जात आहे आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ज्या परिसरात झाडं तोडली जात आहेत, तिथे जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जाणार, असा दावा स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत. याच मुद्द्यावरून ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
"तुम्ही मेगावॅट म्हणताय, पण इथे मेगा वाट लावताय," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. या प्रकल्पाबाबत सार्वजनिक सुनावणी झाली होती का, स्थानिकांनी घेतलेल्या हरकतींचं काय झालं आणि पर्यायी जागांचा विचार केला होता का, असे सवालही त्यांनी विचारले.
साय डोंगरातील जंगल वाचवण्यासाठी आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार ठाकरे यांनी बोलून दाखवला. "मरण आलं तरी चालेल, पण हा लढा थांबता कामा नये," असं म्हणत त्यांनी स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
झाडं वाचवण्यासाठी चिपको आंदोलनासारखा मार्ग स्वीकारावा, असं आवाहनही त्यांनी केलं. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचं नुकसान होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे इतर नेतेही उपस्थित होते.
टोरंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पावरून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे. झाडतोडीमुळे जंगल, जैवविविधता आणि परिसरातील पर्यावरणावर परिणाम होईल, अशी भीती आंदोलक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पावरून संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
आता या प्रकल्पाबाबत सरकार आणि संबंधित कंपनी काय भूमिका घेतात आणि स्थानिकांच्या हरकतींवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याची मागणी या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आली आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.