सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 190 | Moderate 16:23 IST

'मन की बात'मुळे चंद्रपूरच्या विकासाची ऊर्जा मिळाली, मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

'मन की बात'च्या १२ वर्षपूर्तीनिमित्त चंद्रपुरात झालेल्या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी १३८ भागांच्या QR कोडयुक्त पुस्तकाचे विमोचन केले आणि जानेवारी २०२७ मधील युवा संमेलनाची घोषणा केली.

'मन की बात'मुळे चंद्रपूरच्या विकासाची ऊर्जा मिळाली, मुनगंटीवार यांचे प्रतिपादन छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'मधून मिळालेली प्रेरणा माझ्यासाठी फक्त विचारांपुरती राहिली नाही, तर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी ठोस करण्याची ऊर्जा ठरली, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आपण केलेल्या प्रयत्नांतून समाजात मोठा बदल होऊ शकतो, हा विश्वास या कार्यक्रमाने दिला, असे ते म्हणाले. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन, बांबू संशोधन आणि रोजगारनिर्मिती अशा क्षेत्रांत चंद्रपूरसाठी काम करता आले, हे समाधानाचे आणि आनंदाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

'मन की बात'ला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम झाला. त्यात 'मन की बात'च्या १३८ भागांचा QR कोड असलेल्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिकांच्या असामान्य कामातून प्रेरणा घ्यायची आणि तिचे समाजाच्या हिताच्या कृतीत रूपांतर करून विकसित भारताच्या उभारणीत हातभार लावायचा, हाच या उपक्रमाचा खरा संदेश आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, महापौर संगीता खांडेकर, सपनाताई मुनगंटीवार, जिल्हा संघचालक तुषारजी देवपुजारी, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, वासुदेव गाडेगोणे, गीताअनुवादक फातिमा बहन, पांडुरंग आंबटकर, किसनलाल चड्डा यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, गायत्री परिवाराचे सदस्य, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

मुनगंटीवार म्हणाले की, 'मन की बात' हा नुसता संवादाचा कार्यक्रम नाही. तो समाजाला सकारात्मक ऊर्जा देतो आणि विचारांना कृतीची जोड देतो. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी सुरू झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, शेती, सामाजिक परिवर्तन आणि सामान्य माणसाच्या असामान्य कामाची देशाला ओळख झाली. सामान्य माणसाने आपल्या कामातून समाजापुढे आदर्श ठेवला, तर अनेकांना त्यातून प्रेरणा मिळते, हीच या कार्यक्रमाची खरी ताकद आहे, असे ते म्हणाले.

याच विचारांतून जिल्ह्यात सैनिकी शाळा, वन अकादमी, बोटॅनिकल गार्डन, अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण, स्मार्ट अभ्यासिका, वाचनालये, अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल, जलसंधारण, कृषी विज्ञान केंद्र आणि स्थानिक रोजगार प्रकल्प अशा कामांना गती देता आली, असे त्यांनी सांगितले. विकास म्हणजे फक्त इमारती उभारणे नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार, संशोधन आणि सामाजिक प्रगतीतून लोकांचे जीवन समृद्ध करणे होय, असे ते म्हणाले.

नवीन पुस्तकातून विद्यार्थी आणि तरुणांना प्रेरणादायी विचारांशी जोडण्याचा प्रयत्न आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी हे भाग नियमित ऐकावेत, त्यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावेत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. विचारांचे संकलन, त्यांचे आकलन आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्यांचा वापर यातूनच व्यक्तिमत्त्व घडते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समाजात परस्पर आदर, समजूतदारपणा आणि माणुसकीची भावना घट्ट झाली पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले. गीताअनुवादक फातिमा बहन यांनी भगवद्गीतेतील विचार उर्दू भाषेतून पोहोचवण्यासाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. भगवद्गीतेतील कर्तव्य, कर्म आणि शांततेचा संदेश सर्वांपर्यंत गेला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले की धर्म कोणताही असो, मानवतेचे कल्याण आणि एकमेकांबद्दलचा आदर ही समाजाला जोडणारी मूल्ये आहेत. विविध धर्मांचे प्रतिनिधी, युवक, विद्यार्थी आणि समाजातील अनेक घटक कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यातून सामाजिक एकात्मतेचा संदेश गेला, याबद्दल त्यांनी आभार मानले.

९ ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवीन चंद्रपूर परिसरात भव्य युवा संमेलन होणार असून १२ जानेवारी रोजी सुमारे २५ हजार युवकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली. साहित्य, उद्योग, शेती, शिक्षण, संशोधन अशा क्षेत्रांत युवकांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी आणि जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय स्तरावर उंचवावी, हा संमेलनाचा हेतू आहे. जिल्हा नशामुक्त, आरोग्यसंपन्न, ज्ञानसमृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी युवकांची शक्ती चांगल्या दिशेने वळवा, असे त्यांनी सांगितले. मोबाईल व्यसन म्हणून नव्हे, तर ज्ञान, कौशल्य आणि प्रगतीचे साधन म्हणून वापरावा, असेही ते म्हणाले.

शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगार या क्षेत्रांत जिल्ह्यात विविध उपक्रम सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. महिलांच्या शिक्षणासाठी विद्यापीठीय सुविधा, विद्यार्थिनींच्या कौशल्य विकासासाठी केंद्रे, आधुनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार, शेतीतील नवे प्रयोग आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ देणारी कृषी हाट यांचा त्यांनी उल्लेख केला. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील मध्यस्थांची साखळी कमी करून शेतकऱ्यांच्या सेंद्रिय उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळावी आणि पौष्टिक अन्नाला प्रोत्साहन मिळावे, म्हणून कृषी हाट आणि फूड कोर्टची संकल्पना पुढे नेली जात आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या नैसर्गिक संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी आणि आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी करण्यावरही भर आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी बल्लारपूर विधानसभेतील शेतकऱ्यांच्या कामगिरीचा गौरव झाला. महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित १३ शेतकऱ्यांपैकी ७ जण पोंभूर्णा तालुक्यातील आहेत. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी बल्लारपूर, जिवती आणि ब्रह्मपुरी हे तीन तालुके सुरुवातीला दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नव्हते. तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांनाही दुष्काळी मदत मिळावी, यासाठी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सतत पाठपुरावा केला. त्यानंतर या तिन्ही तालुक्यांचा यादीत समावेश झाला आणि आता जिल्ह्यातील सर्व १५ तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांत आहेत. या प्रयत्नांबद्दल शेतकऱ्यांनी मुनगंटीवार यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ