कझाकस्तानच्या गवताळ प्रदेशात दोन शतकांनंतर प्रझेवाल्स्की घोड्याची दोन शिंगरे जन्मली
कझाकस्तानच्या मोकळ्या गवताळ प्रदेशात जगातील एकमेव खऱ्या जंगली घोड्याची दोन शिंगरे जन्मली आहेत. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) अहवालानुसार, अलिबी पुनर्वसन केंद्रात २२ ऑगस्टला पहिल्या शिंगराचा जन्म झाला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कझाकस्तानच्या विशाल गवताळ प्रदेशातून एक आनंदाची बातमी आली आहे. जगातील एकमेव खऱ्या जंगली घोड्याची, म्हणजे प्रझेवाल्स्की घोड्याची (Przewalski's Horse), दोन लहान शिंगरे तिथे जन्मली आहेत. सुमारे दोन शतकांनंतर कझाकस्तानच्या मोकळ्या हवेत हे घडले आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षण करणाऱ्यांमध्ये आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) अहवालानुसार, २२ ऑगस्टच्या सकाळी कझाकस्तानमधील अलिबी पुनर्वसन केंद्र (Alibi Rehabilitation Centre) आणि वन्यजीव अभयारण्यात एका ७ वर्षांच्या प्रझेवाल्स्की घोडीने शिंगराला जन्म दिला. तज्ज्ञांच्या मते, या मोकळ्या गवताळ प्रदेशात नैसर्गिकरित्या जन्मलेले हे गेल्या दोन शतकांतील पहिलेच शिंगरू असू शकते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी 'उंब्रा' नावाच्या ६ वर्षांच्या दुसऱ्या घोडीने आणखी एका नर शिंगराला जन्म दिला.
या प्रजातीला मानवी हस्तक्षेप, शिकार आणि शेतीमुळे नैसर्गिक अधिवासातून नामशेष मानले गेले होते. एकेकाळी मध्य आशियातील गवताळ प्रदेशात हे घोडे हजारोंच्या संख्येने मुक्तपणे फिरत असत. मात्र १९व्या शतकाच्या शेवटी त्यांची संख्या वेगाने घटत गेली. १९६९ मध्ये गोबीच्या वाळवंटात हे घोडे शेवटचे नैसर्गिक वातावरणात फिरताना दिसले होते. त्यानंतर ते जंगलातून गायब झाले आणि फक्त प्राणिसंग्रहालयांपुरते उरले.
वन्यजीव संरक्षक अल्बर्ट सालेमगेरेयेव्ह (Albert Salemgareyev) या संवर्धन मोहिमेत रात्रंदिवस काम करतात. २२ ऑगस्टच्या सकाळी अभयारण्यातील सहकाऱ्याचा फोन आला, तेव्हा त्यांनी कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथून अलिबी पुनर्वसन केंद्रापर्यंत तब्बल १२ तासांचा प्रवास केला. ते पोहोचले तेव्हा शिंगरू आईच्या कुशीत शांतपणे विसावले होते आणि त्याचे चिमुकले पाय अजूनही जमिनीवर लडखडत होते. अल्बर्ट म्हणाले, "माझ्यासाठी तो अत्यंत भावनिक क्षण होता. हे केवळ एक घोडा किंवा शिंगरू नाही, तर कझाकस्तानमधील एका नव्या पिढीची आणि समृद्ध निसर्गाची नवी सुरुवात आहे."
प्रझेवाल्स्की घोडे पृथ्वीवर शिल्लक राहिलेले एकमेव खरे 'जंगली' घोडे मानले जातात. आज आपण पाहतो ते बहुतेक घोडे पाळीव घोड्यांच्या प्रजातींमधून आलेले आहेत. प्रझेवाल्स्की घोड्यांची जीन्स आणि डीएनए मात्र मानवाने कधीही पाळीव न केलेल्या मूळ जंगली प्राण्यांचे प्रतिनिधित्व करतात. लहान पण मजबूत शरीर, मानेवर उभी राहणारी ताठ आयाळ आणि कडक हिवाळ्यात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्याची विशेष क्षमता ही या घोड्यांची खासियत आहे.
१९०० च्या दशकाच्या मध्यापर्यंत मानवी हस्तक्षेप वाढल्याने त्यांचा विनाश सुरू झाला. अनियंत्रित शिकार, शेती व पशुपालनासाठी गवताळ प्रदेशाचा झालेला नाश आणि पाळीव जनावरांशी अन्नासाठी झालेली स्पर्धा यामुळे कळप हळूहळू नष्ट झाले. सुदैवाने युरोपमधील काही प्रमुख प्राणिसंग्रहालयांमध्ये हे घोडे सुरक्षित ठेवण्यात आले होते. तिथे शास्त्रज्ञांनी प्रजननाचा कार्यक्रम राबवून त्यांचा जनुकीय साठा (Genetic Pool) जपून ठेवला.
२०२४ पासून कझाकस्तान सरकारने युरोपियन प्राणिसंग्रहालयांच्या सहकार्याने या घोड्यांना पुन्हा त्यांच्या मूळ भूमीत आणण्याची योजना आखली. पहिल्या टप्प्यात युरोपमधून २२ प्रझेवाल्स्की घोडे अलिबी पुनर्वसन केंद्रात विमानाने आणण्यात आले. त्यांना इथल्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी विशेष देखरेखीत ठेवले होते. २०२९ पर्यंत कझाकस्तानच्या गवताळ प्रदेशात एकूण ४० घोड्यांना टप्प्याटप्प्याने मोकळे सोडण्याची योजना आहे.
युरोपमधून आणलेल्या या घोड्यांनी कझाकस्तानच्या नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेतले आणि काही महिन्यांतच दोन नव्या शिंगरांना जन्म दिला. यावरून कझाकस्तानची माती आणि गवताळ प्रदेश या दुर्मिळ घोड्यांसाठी पुन्हा सुरक्षित आणि अनुकूल झाले आहेत, हे स्पष्ट होते. मानवाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न केले, तर नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींनाही पुन्हा नवजीवन देता येते, हे या घटनेने सिद्ध केले आहे.