सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
16:21 IST

महाबळेश्वरमध्ये उंच पत्र्यांच्या आडून काय चाललंय? कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीत मिळकतींभोवती १० ते १५ फुटांपर्यंत उंच पत्रे आणि वॉल कंपाउंड उभारल्याचा आरोप करत सूर्यकांत (बाळासो) पांचाळ यांनी जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाकडे तपासणीची मागणी केली आहे.

महाबळेश्वरमध्ये उंच पत्र्यांच्या आडून काय चाललंय? कार्यकर्त्याची चौकशीची मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

महाबळेश्वर हे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे इथली नैसर्गिक संपदा, जैवविविधता आणि पर्यावरण जपण्यासाठी जे नियम आहेत, त्यांची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक व पर्यावरण बचाव कार्यकर्ते सूर्यकांत (बाळासो) पांचाळ यांनी एक आरोप केला आहे.

पांचाळ यांच्या म्हणण्यानुसार, महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील काही खासगी व व्यावसायिक मिळकतींभोवती १० ते १५ फुटांपर्यंत उंच पत्रे आणि उंच वॉल कंपाउंड उभारण्यात आले आहेत. हे पत्रे आणि भिंती उंच व अपारदर्शक असल्याने त्यांच्या आडून नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची प्रशासनाने तातडीने तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि महाबळेश्वर नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

परिसराची पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेता, मिळकतींभोवती घालण्यात येणाऱ्या कुंपणांबाबतच्या नियमांची तपासणी होणे गरजेचे आहे, असे पांचाळ यांनी निवेदनात म्हटले आहे. काही ठिकाणी उंच पत्रे आणि भिंतींमुळे आतला भाग पूर्णपणे झाकला जातो. त्यामुळे तिथे कोणते बांधकाम किंवा विकासकाम सुरू आहे, याची माहिती सहज मिळत नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

पांचाळ यांचा दावा आहे की, उंच पत्रे आणि कंपाउंडच्या आडून रात्रीच्या वेळी वृक्षतोड, जुन्या वृक्षांच्या मुळांना नुकसान, डोंगरउतार कापणे, मातीचे उत्खनन, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये बदल किंवा परवानगीपेक्षा जास्त बांधकाम असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच अशा सर्व मिळकतींची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबरोबरच या मिळकतींच्या बांधकाम परवानग्या, मंजूर नकाशे, बांधकामाची व्याप्ती आणि प्रत्यक्षात झालेले बांधकाम यांची कागदपत्रांवरूनही तपासणी व्हावी, असे त्यात म्हटले आहे.

पांचाळ यांच्या मागणीनुसार महाबळेश्वर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने उंच पत्रे किंवा अवाजवी उंच कंपाउंड असलेल्या सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करावे. त्या मिळकतींमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची कायदेशीरता तपासावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

नियमबाह्य आणि अपारदर्शक पत्र्यांची कुंपणे हटवून, गरजेनुसार पारदर्शक जाळीचे कुंपण करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाबळेश्वर नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे आणि संबंधित मिळकत धारकांना नोटिसा बजावाव्यात, अशी मागणी पांचाळ यांनी केली आहे. पर्यावरणीय किंवा बांधकामविषयक नियमांचे उल्लंघन आढळले, तर संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार (MRTP) कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ