रशियाचे पहिले डिझेल टँकर न्यूयॉर्कच्या वाटेवर, ट्रम्प यांची इंधन दरवाढ रोखण्याची धडपड
रशियाच्या प्रिमोर्स्क बंदरातून सुमारे ४० हजार मेट्रिक टन डिझेल घेऊन निघालेले जहाज ७ नोव्हेंबरपर्यंत न्यूयॉर्कला पोहोचण्याचा अंदाज आहे. युक्रेनने नाराजी व्यक्त केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
रशिया आणि अमेरिका यांच्यात आता ऊर्जा व्यापार सुरू झाला आहे. कित्येक वर्षे हे दोन्ही देश एकमेकांशी भांडत होते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतले होते. जागतिक राजकारण बदलत असल्यामुळे आता त्यांच्यात थेट व्यापार होताना दिसत आहे.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पिस्कोव्ह यांनी २३ ऑक्टोबर रोजी सांगितले की, अमेरिकेच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या टँकरचा प्रवास सुरू झाला आहे. माल्टा देशाचा झेंडा असलेले Agioi Fanendes हे जहाज २२ ऑक्टोबर रोजी रशियाच्या प्रिमोर्स्क बंदरातून निघाले. त्यात सुमारे ४० हजार मेट्रिक टन अल्ट्रा लो सल्फर डिझेल आहे. हे जहाज ७ नोव्हेंबरपर्यंत न्यूयॉर्कमध्ये पोहोचेल, असा अंदाज आहे.
हा व्यापार का सुरू झाला, याचे कारण स्पष्ट आहे. अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि त्यानंतर होर्मूझ बंद आहे. त्यामुळे अमेरिकेत तेलाचे दर वाढत आहेत. त्याचा फटका अमेरिकेतील निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना बसू शकतो. म्हणूनच त्यांची धडपड सुरू असून त्यांनी चक्क रशियाकडून तेल खरेदी करायला सुरुवात केली आहे.
ट्रम्प यांनी आधी ३ लाख टन डिझेल पुरवठ्याची घोषणा केली होती. नंतर त्यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये ५ लाख टन आणि पुढच्या टप्प्यात १० लाख टन पुरवठ्याचे नियोजन आहे. मात्र पहिल्या टँकरमधील तेल अमेरिकेच्या रोजच्या वापराच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या फक्त एकच जहाज निघाले आहे, त्यामुळे लगेच निष्कर्ष काढणे योग्य नाही. शिवाय ट्रम्प यांची आतापर्यंतची वक्तव्ये आणि भूमिका पाहता ते बेभरवशाचे आहेत, अशी खात्री अमेरिकेतील जनतेसह जगाला झाली आहे.
या व्यापारावर युक्रेनने नाराजी व्यक्त केली आहे.
या निमित्ताने अमेरिकेच्या दुटप्पी धोरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारताने रशियाकडून मिळणारे स्वस्त तेल घेण्यावर निर्बंध आणले. कारण असे सांगितले गेले की, भारताने तेल घेतले तर रशिया त्या पैशांचा वापर युक्रेनवरील हल्ल्यासाठी करतो. आता अमेरिका स्वतः रशियाकडून थेट तेल विकत घेत आहे. मग रशियाला तुम्ही पैशांऐवजी दगडधोंडे देत आहात काय, असा सवाल केला जात आहे. आम्ही सांगू तीच नैतिकता, असे अमेरिकेचे तत्त्व आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी साऱ्या जगाला पणाला लावायला अमेरिका मागेपुढे पाहणार नाही, अशा चर्चा सुरू आहेत.
अमेरिका आणि रशिया यांच्यातील हा व्यापार किती काळ चालतो, हे पाहणे गरजेचे आहे. कारण यावर बरेच जागतिक राजकारण अवलंबून आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.