पत्ता शेअर करणे पडले महागात: दिवाळीत मिठाईऐवजी इन्फ्लुएन्सरच्या घरी १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
मदुरैतील इन्फ्लुएन्सर वीरमणिने दिवाळीत मिठाईसाठी घरचा पत्ता शेअर केला, पण फॉलोअर्सनी प्रँक म्हणून महागड्या वस्तू कॅश ऑन डिलिव्हरीने पाठवल्या.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
तामिळनाडूतील मदुरै येथे राहणाऱ्या वीरमणि नावाच्या एका इन्फ्लुएन्सरला दिवाळीच्या निमित्ताने आपला पत्ता सोशल मीडियावर शेअर करणे चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या फॉलोअर्सनी त्याच्यासोबत प्रँक करायचे ठरवले आणि त्याच्या घरच्या पत्त्यावर महागडे गिफ्ट येऊ लागले. हे इतके वाढले की वीरमणि हैराण झाला आणि त्याने अखेर व्हिडिओ बनवून नेटकऱ्यांना खडे बोल सुनावले.
वीरमणि हा सोशल मीडिया क्रिएटर असून त्याला चांगला फॅन फॉलोइंग आहे. यंदाच्या दिवाळीत फॉलोअर्सकडून थोडे प्रेम आणि मिठाई मिळावी, असा विचार त्याने केला. त्यासाठी त्याने आपला फोन नंबर आणि घरचा पत्ता ऑनलाईन शेअर केला होता. फॉलोअर्सकडून मिठाई येईल, अशी त्याची अपेक्षा होती.
पत्ता शेअर होताच मिठाईऐवजी वेगळेच घडू लागले. काही फॉलोअर्सनी वीरमणिच्या घरी मिठाई न पाठवता महागडे गिफ्ट्स पाठवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे या वस्तूंची ऑर्डर देताना पेमेंट कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ठेवण्यात आले होते. फॉलोअर्सनी सामानाची ऑर्डर तर दिली, पण त्याचे पैसे दिले नाहीत.
त्यामुळे टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा महागड्या वस्तू त्याच्या घरी पोहोचू लागल्या आणि डिलिव्हरी एजंट त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागले. या सर्व सामानाची किंमत तब्बल १.६९ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे मिठाईची अपेक्षा ठेवणाऱ्या वीरमणिच्या घराबाहेर लाखो रुपयांच्या पार्सलची रांग लागली.
पार्सलची संख्या काही केल्या कमी होत नव्हती. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर वीरमणि या सगळ्या गोष्टींना कंटाळून गेला. शेवटी त्याने सोशल मीडियावर नवा व्हिडिओ शेअर केला आणि त्यात हात जोडून यूजर्सना विनंती केली.
या व्हिडिओत तो म्हणाला, "भावांनो, तुम्ही हे का करत आहात? डिलिव्हरी करणारे लोक खूप लांबून येत आहेत. त्या सर्वांना पैसे द्यायला माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत... कृपया, हे थांबवा."
तरीही काही खोडकर यूजर्सनी चुकीच्या ऑर्डर्स करणे थांबवले नाही. तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी आणि शांतता मिळवण्यासाठी आपल्याला शहर सोडून जावे लागेल, असे वीरमणिने जाहीर केले.