कप केकमध्ये प्लास्टिकचे तुकडे; संभाजीनगरमधील रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित
चिकलठाणा एमआयडीसीतील मे. रॉयल बेकर्स अँड कन्फेक्षनर्सचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने ८ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
छत्रपती संभाजीनगरमध्ये खाण्यासाठी घेतलेल्या कप केकमध्ये रबर किंवा प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यातच तपासणीत अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड झाले. त्यामुळे चिकलठाणा एमआयडीसीतील मे. रॉयल बेकर्स अँड कन्फेक्षनर्स या बेकरीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निलंबित केला आहे.
ही कारवाई ८ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. या काळात बेकरीला अन्न व्यवसाय करता येणार नाही.
सेफ फूड, सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. अजिंठेकर यांनी ७ ऑक्टोबर रोजी बेकरीची अचानक तपासणी केली. या तपासणीत अन्नपदार्थ आणि पाण्याच्या गुणवत्तेचे प्रयोगशाळा अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळले. पुन्हा पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे फूड-ग्रेड प्रमाणपत्रही नव्हते. तसेच ठेवण्यासाठी पात्र तांत्रिक व्यक्ती अनुपस्थित असल्याची त्रुटीही तपासणीत समोर आली.
याशिवाय कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी आणि लसीकरण झालेले नव्हते. कामगार अॅप्रन, हातमोजे आणि डोक्याचे संरक्षक आवरण वापरत नव्हते, असेही तपासणीत दिसून आले. बेकरीत कीड नियंत्रण आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था नव्हती, तसेच कचरा उघड्यावर टाकण्यात आला होता.
या त्रुटींमुळे अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले. म्हणून परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) दयानंद विठ्ठल पाटील यांनी परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.
संबंधित व्यावसायिकाला सर्व त्रुटी दूर करून आवश्यक पुराव्यांसह अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निलंबनाच्या काळात बेकरीवर कडक पाळत ठेवण्याचे आदेश सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तपासणीत समोर आलेल्या बाबींमध्ये कप केकमध्ये रबर-प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार, प्रयोगशाळा अहवाल, फूड-ग्रेड प्रमाणपत्र आणि साठा नोंदवहीचा अभाव, अस्वच्छता, उघड्यावर कचरा, कीड नियंत्रणाचा अभाव आणि कामगारांच्या आरोग्य-सुरक्षेकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे.