बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियम मोडणाऱ्या चहा सेंटरचा परवाना निलंबित
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २४ सप्टेंबर रोजी बीड शहरात दोन ठिकाणी गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. जालना रोडवरील चहा-नाश्ता सेंटरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर आणि स्वच्छता व सुरक्षिततेचे नियम मोडणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने बीडमध्ये कारवाई केली आहे. अन्नपदार्थ तयार करण्याच्या आणि विकण्याच्या ठिकाणी हे नियम पाळले जात नसल्याचे प्रशासनाने समोर आणले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २४ सप्टेंबर रोजी बीड शहरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. तिथे प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला.
संबंधित विक्रेत्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, जालना रोडवरील एका चहा-नाश्ता सेंटरमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या, म्हणून त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
पहिली कारवाई बशीरगंज येथील जमील पान सेंटरवर झाली. गोपनीय माहितीच्या आधारे तिथे छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान प्रतिबंधित गोवा आणि बाओबाजी पानमसाल्यासह ५ हजार ६०८ रुपयांचा गुटखा व पानमसाला आढळून आला. याप्रकरणी पानटपरीचालक सैयद मुशरत अली सैयद हमीद अली आणि विक्रेता शेख तोहिद अफसर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच दिवशी जिल्हा रुग्णालयासमोरील कमानीजवळच्या चहा व भजीच्या ठेल्याचीही तपासणी करण्यात आली. तिथे खाकी रंगाच्या पुठ्यात वेगवेगळ्या कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा सापडला. याप्रकरणी ठेलाचालक शेख माजेद शेख खालेद यांच्याविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परवाना निलंबनाची कारवाई बीड शहरातील साठे चौकातील मे. अप्पा चहा नाश्ता सेंटरवर झाली. या सेंटरची तपासणी २७ जुलै रोजी करण्यात आली होती. तिथे उंदरांना रोखण्याची व्यवस्था नव्हती आणि विष्धा, कीटक व पाण्याच्या तपासणीचा अहवाल नव्हता. भांडी धुण्याच्या जागेवर अन्न शिजवले जात होते आणि नॉन-फूड ग्रेड पिशव्या व वृत्तपत्र कागद वापरला जात होता. अवैध कृत्रिम रंगांचा वापर होत होता आणि कामगार तंबाखू सेवन करत होते. या गंभीर त्रुटींमुळे अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार या आस्थापनेचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
गुटखा विक्रीवरील कारवाई थांबणार नाही. प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विकणाऱ्यांविरोधात बीड शहरासह जिल्ह्यात तपासणी व कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
हॉटेल, चहा-नाश्ता केंद्र आणि खाद्यपदार्थ विकणाऱ्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडल्यास किंवा आरोग्याला धोका होईल अशा त्रुटी आढळल्यास त्या आस्थापनेवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.