पुणे विभागात १८ लाख २५ हजार ८३२ रुपयांचा अन्नसाठा जप्त, १७ आस्थापनांचे परवाने निलंबित
सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवली.
सणासुदीच्या दिवसांत अन्न पदार्थांना मागणी वाढते. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात विशेष मोहीम राबवली. भेसळीचा संशय असलेले, लेबलमध्ये दोष असलेले तसेच बनावट आढळलेले अन्न पदार्थ यात जप्त करण्यात आले. या साठ्याची एकूण किंमत १८ लाख २५ हजार ८३२ रुपये आहे.
ही कारवाई २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत झाली. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन दिसल्याने १७ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत ही कारवाई झाली. पुणे जिल्ह्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे उत्पादक, मिठाई विक्रेते, डेअरी, हॉटेल आणि इतर आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
पुणे जिल्ह्यात नवनाथ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथून २५ हजार ९२० रुपयांचा श्रीखंड जप्त झाला. अदिती मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथून ४३ हजार ९८० रुपयांची स्वीट लस्सी आणि मँगो लस्सी ताब्यात घेण्यात आली. ओशन मिल्क अँड फूड प्रॉडक्ट्स येथे २ लाख ७४ हजार ७०० रुपयांचे तूप आणि खोवा जप्त झाला.
मार्केट यार्डातील लक्ष्मीनारायण ट्रेडिंग कंपनी येथून ४ लाख ४८ हजार ३८० रुपयांचे बदाम जप्त करण्यात आले. पुरंदर येथील पांडियन प्रॉडक्ट्स अँड सेलिंग येथे सुमारे ५.५६ टन विविध मिठाई सापडली, तिची किंमत ५ लाख ९६ हजार ३०० रुपये आहे. उरुळी देवाची येथून २ लाख ५७ हजार १६४ रुपयांचे चीज आणि वारजे येथून ५५ हजार ६०० रुपयांचे तूप जप्त झाले. मोरबीवाला स्वीट्स अँड नमकीन येथून नमकीन पदार्थांचा साठा ताब्यात घेण्यात आला.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतही दूधजन्य पदार्थ, तूप आणि क्रीमचा साठा जप्त झाला. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि दूध संकलन केंद्रांसह १७ आस्थापनांचे परवाने निलंबित झाले. तिथे अस्वच्छता होती, झुरळे आणि किडे फिरताना आढळले, तसेच अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाले होते.
सणासुदीच्या काळात खवा, मावा, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते, असे प्रशासनाने म्हटले आहे. दूध आणि त्यापासून बनणाऱ्या पदार्थांमध्ये वनस्पतीजन्य चरबी किंवा इतर घटकांचा अनधिकृत वापर करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न पदार्थाचा दर्जा किंवा स्वच्छता याबद्दल तक्रार असेल, तर १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर ती नोंदवता येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.