सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट कमी होते का?
उपाशीपोटी व्यायाम करणे वजन कमी करण्यासाठी लोकप्रिय आहे, पण त्यामुळे वजन झटपट कमी होईलच असे नाही. आहार, झोप आणि कॅलरी यांचाही मोठा वाटा असतो.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. त्यातली एक लोकप्रिय पद्धत म्हणजे उपाशीपोटी व्यायाम करणे, म्हणजेच सकाळी काहीही न खाता व्यायाम करणे. काहींच्या मते, रिकाम्या पोटी व्यायाम केला की शरीरात साठवलेल्या चरबीचा ऊर्जेसाठी जास्त वापर होतो आणि त्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होऊ शकते.
मात्र वजन कमी करण्यात फक्त हाच एक मुद्दा महत्त्वाचा नसतो. व्यायामाची तीव्रता, एकूण कॅलरी सेवन, आहार, झोप आणि नियमित व्यायाम या गोष्टींचीही त्यात मोठी भूमिका असते. म्हणजेच केवळ सकाळी काहीही न खाता व्यायाम केला म्हणून वजन कमी होईल, असे गृहीत धरता येत नाही. त्यामुळे रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट लॉस होतो का, हा प्रश्न पुढे येतो.
रात्रभर पोट रिकामे राहिल्यामुळे सकाळी केलेला हलका किंवा मध्यम कार्डिओ व्यायाम चरबीचे ऑक्सिडेशन वाढवण्यास मदत करू शकतो, असे सांगितले जाते. रिकाम्या पोटी व्यायाम केल्यावर शरीर ऊर्जेसाठी चरबीचा वापर करते. पण चरबीचे ऑक्सिडेशन वाढले म्हणजे वजन झटपट कमी होईलच, असा त्याचा अर्थ नाही. वजन कमी करायचे असेल, तर एकूण कॅलरी खर्च आणि आहार यांच्यातला समतोल जास्त महत्त्वाचा आहे.
काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करणे सोपे आणि आरामदायक वाटू शकते. विशेषतः चालणे, हलके सायकलिंग किंवा कमी तीव्रतेचा कार्डिओ यासाठी ही पद्धत योग्य आहे.
रिकाम्या पोटी व्यायाम करणे मात्र प्रत्येकासाठी योग्य नसते. काही जणांना जास्त वेळ किंवा तीव्र व्यायाम केल्यानंतर अशक्तपणा, चक्कर येणे, थकवा जाणवू शकतो किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. मधुमेह, लो ब्लड शुगर किंवा आरोग्याच्या इतर समस्या असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे या माहितीत सांगितले आहे.
फॅट लॉस हवा असेल, तर फक्त रिकाम्या पोटी व्यायामावर अवलंबून राहण्यापेक्षा नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेसे प्रथिने, चांगली झोप आणि एकूण कॅलरी सेवन यावर लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे, असे या माहितीत म्हटले आहे. रिकाम्या पोटी व्यायाम करताना अशक्तपणा जाणवत असेल, तर जबरदस्तीने व्यायाम करण्यापेक्षा व्यायामापूर्वी हलका नाश्ता करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.
हा मजकूर केवळ सामान्य माहितीसाठी आहे आणि त्यात कोणत्याही उपचाराचा दावा केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.