अकोल्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, १९०० किलो खाद्यपदार्थ जप्त
असुरक्षित पद्धतीने अकोल्यात आणला जाणारा मावा, खवा, हलवा यासह सुमारे 1900 किलो माल सोमवारी जप्त करण्यात आला. बीडमध्येही प्रशासनाने गुटखा आणि पानमसाल्यावर कारवाई केली.
अकोल्यात असुरक्षित पद्धतीने आणला जात असलेला मावा, खवा, हलवा यासह सुमारे 1900 किलो खाद्यपदार्थ अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी मोठी कारवाई करून जप्त केला. या कारवाईत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र वीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
रायली जिन परिसरातील आरको ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून खाद्यपदार्थ असुरक्षित पद्धतीने अकोल्यात आणले जात आहेत, अशी माहिती वीर यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सोमवारी दुपारी ११.३० वाजता आरको ट्रान्सपोर्ट, रायली जिन, अकोला येथे तपासणी करण्यात आली.
तपासणीत अहमदाबाद, गुजरात येथून विविध ब्रँडचा साठा आल्याचे समोर आले. त्यात स्वीट हलवा (अंबिका), ट्रॅडिशनल स्वीट (जीडब्लूएएल), हलवा (श्री जीडब्ल्यूएएल), रिच स्वीट (अंबिका), ब्रजनिधी स्वीट आणि मुरलीधर स्वीट यांचा समावेश आहे. हा माल एमपी-०९/एचक्यू-५००४ आणि एमएच-२८/एबी-७८८२ या क्रमांकाच्या दोन ट्रकमधून अहमदाबाद, गुजरात येथून आणण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे.
अन्न पदार्थांचे नियमित नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नमुने घेतल्यानंतर उरलेला १९०० किलोचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ५ लाख ७२ हजार रुपये आहे. हा साठा अकोला महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या बायोगॅस प्रकल्पात, भोड येथे नष्ट केला जाणार आहे.
हा माल मागवणारे व्यापारी कमल शर्मा, वैभव पाटील आणि अशोक अहुजा यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावतीचे सहआयुक्त सचिन केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. सहाय्यक आयुक्त, अकोला देवानंद वीर आणि अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बोरचाटे यांनी ती केली आहे.
दुसरीकडे, बीडमध्येही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात, तसेच अन्नपदार्थांच्या निर्मिती आणि विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ही कारवाई झाली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २४ सप्टेंबर रोजी बीड शहरात दोन ठिकाणी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला.
संबंधित विक्रेत्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, जालना रोडवरील एका चहा-नाश्ता सेंटरमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या, म्हणून त्याचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे.