वेस्ट बँकमध्ये इस्रायलचा कडक लॉकडाऊन, १२०० पॅलेस्टिनींना घरे सोडावी लागली
हेब्रोनजवळ झालेल्या गोळीबारात दोन इस्रायली सैनिक ठार झाल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी संपूर्ण वेस्ट बँकमध्ये लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
इस्रायलने पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये कडक लॉकडाऊन लागू केला आहे. मध्य पूर्वेतला संघर्ष आधीच टोकाला पोहोचलेला असताना या निर्णयामुळे तणाव आणखी वाढला आहे. हेब्रोन शहराजवळ झालेल्या गोळीबारात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी हा निर्णय घेतला आहे.
हेब्रोनजवळ लष्कराचा एक तपासणी नाका आहे. तिथे पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांनी अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिक ठार झाले, तर बाकीचे तीन सैनिक गंभीर जखमी झाले. इस्रायली सैन्याने लगेच प्रतिहल्ला केला आणि त्यात दोन पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले.
या घटनेनंतर नेतन्याहू यांनी हेब्रोनला तातडीने वेढा घालण्याचे आणि संपूर्ण वेस्ट बँकमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच इस्रायली सैनिकांनी पूर्ण शहराला वेढा घालून कडक कारवाई सुरू केली. हा लॉकडाऊन कायदेशीरदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे, याबद्दल आता जगभर चर्चा सुरू झाली आहे.
लष्करी कारवाईत हेब्रोनमधील अल जालादा आणि ऐन देयर बहा या भागांत मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्यात आले. अनेक घरांची झाडाझडती घेतली गेली. काही घरे, दुकाने आणि इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. यामुळे अंदाजे १२०० पॅलेस्टिनी नागरिकांना आपली राहती घरे आणि संसार सोडून मिळेल त्या सुरक्षित जागी जावे लागले आहे. युद्धामुळे निष्पाप माणसांवर आपल्या हक्काच्या जागेतून स्थलांतर करून उपेक्षित आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. वृद्ध आणि लहान मुलांना याचा जास्त त्रास होत आहे. सगळ्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सामान्य माणसाच्या आयुष्याची अक्षरशः वाताहत झाली आहे.
इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील अनेक शहरांचे महत्त्वाचे रस्ते आणि प्रवेशद्वारे बंद केली आहेत. ठिकठिकाणी लष्करी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. प्रत्येक नागरिकाच्या सगळ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याचा फटका रुग्णालये, शाळा, व्यापार आणि रोजगार यांना बसत आहे. काही नागरिकांना उपचारांसाठीही बाहेर पडता येत नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.
पॅलेस्टिनी प्रशासनाने या कारवाईला सामूहिक शिक्षा म्हटले आहे. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्या घडामोडींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.