ओमानच्या समुद्रात दुर्मिळ गुलाबी डॉल्फिन दिसले, प्रजातीची अद्याप अधिकृत खात्री नाही
मस्कतमधील कतांब बीचजवळ गुलाबी रंगाचे डॉल्फिन इतर गडद डॉल्फिनसोबत पोहताना दिसले; व्हिडीओ व्हायरल झाले, पण प्रजाती आणि रंगाचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ओमानच्या किनारपट्टीवर एक अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे. निळ्याशार समुद्राच्या पाण्यात एखादा गुलाबी रंगाचा डॉल्फिन पोहताना दिसला, तर कोणालाही आश्चर्य वाटेल. ओमानची राजधानी मस्कत येथील कतांब बीचजवळ दुर्मिळ गुलाबी रंगाचे डॉल्फिन समुद्रात पोहताना दिसले आहेत.
मस्कतमधील कतांब बीचच्या किनाऱ्याजवळ दिसलेले हे गुलाबी डॉल्फिन इतर गडद रंगाच्या डॉल्फिनसोबत पोहत होते. समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन ते पुन्हा पाण्यात डुबकी मारत असल्याची दृश्ये काही पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये या अनोख्या समुद्री जिवाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या व्हिडीओमुळे या डॉल्फिनची चर्चा आता जगभर सुरू झाली आहे. मात्र हे डॉल्फिन नेमक्या कोणत्या प्रजातींचे आहेत, याची अद्याप अधिकृत खात्री झालेली नाही.
डॉल्फिनचा रंग सामान्यतः राखाडी किंवा गडद असतो. पण काही विशिष्ट प्रजातींमध्ये वयानुसार त्वचेचा रंग बदलून गुलाबी किंवा फिकट पांढरट होऊ शकतो. इंडो-पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिनमध्येही असा रंग दिसतो. त्वचेखालच्या रक्तवाहिन्या स्पष्ट दिसणे आणि रक्ताभिसरणातील बदल यामुळे त्वचेला गुलाबी छटा मिळू शकते. काही प्रकरणांत रंगद्रव्यातील बदल किंवा अल्बिनिझमसारखी स्थितीही कारणीभूत ठरू शकते. मात्र ओमानमध्ये दिसलेल्या डॉल्फिनच्या रंगामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ओमानच्या समुद्रात डॉल्फिनच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यामुळे फक्त गुलाबी रंगावरून या जिवाची प्रजाती ठरवता येत नाही. काही तज्ज्ञांनी हे रिसो डॉल्फिन किंवा इंडो-पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिन असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पण याला वैज्ञानिक पुष्टी मिळालेली नाही. या अनोख्या दर्शनामुळे ओमानच्या समुद्रातील जैवविविधतेकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
अशा प्रकारची घटना बहुधा पहिल्यांदाच घडली आहे किंवा माणसाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे जगभरात वेगवेगळ्या चर्चांना आणि अफवांना पेव फुटले आहे आणि सगळेजण आपापले तर्क लावत आहेत. हा गुलाबी डॉल्फिन रात्री फिरून पुन्हा समुद्राच्या तळाशी गेला असता, तर तो आपल्याला अजूनही दिसला नसता.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.