तरुणपणीच गुडघ्यांत कटकट आवाज येतोय? ३०-४० व्या वर्षीही सांध्यातील ग्रीस संपू शकते
पायऱ्या चढताना-उतरताना गुडघ्यांतून आवाज येत असेल आणि वेदना, सूज जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पूर्वीच्या काळी वय वाढल्यानंतर शरीराला आजार लागायचे. आता मात्र जीवनशैली बदलली आहे आणि कामाचा ताणही वाढला आहे. त्यामुळे तरुण वयातच गंभीर आजार होतात आणि तब्येत पूर्णपणे बिघडते.
पायऱ्या चढताना किंवा उतरताना गुडघ्यांतून कटकट आवाज येतो आणि मग गुडघे दुखायला लागतात, असे बऱ्याचदा घडते. आवाजाबरोबरच वेदना, सूज, सांधा अडकणे किंवा चालताना गुडघा अस्थिर वाटणे अशी लक्षणे दिसू लागली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
गुडघ्यांतून आवाज येण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. गुडघा दुमडताना किंवा सरळ करताना सांध्यांच्या हाडांवरून लिगामेंट सरकते, तेव्हा कट-कट असा आवाज येतो. शिवाय दोन हाडांमध्ये गादीसारखी मऊ उती असते. वय वाढल्याने किंवा झिजेमुळे तिच्यात अनेक बदल होतात. त्याचा परिणाम म्हणून सांध्यातील द्रवाची गुणवत्ता बदलते आणि सांध्यांतून कटकट आवाज येऊ लागतो. वयाच्या ३० किंवा ४० व्या वर्षीसुद्धा सांध्यातील ग्रीस संपून जाऊ शकते.
गुडघे निरोगी ठेवायचे असतील तर नियमित शारीरिक हालचाल आणि व्यायाम फार आवश्यक आहे. मांडी आणि नितंबाच्या स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम केले तर गुडघ्यांतील वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होते. व्यायाम करताना योग्य तंत्र वापरावे. त्यामुळे वेदना कमी होतात आणि गुडघ्यांचे आरोग्य चांगले राहते. वजन जास्त असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे गरजेचे आहे.
गुडघ्यांतून वारंवार कटकट आवाज येत असेल, तर वेळ न घालवता डॉक्टरांना दाखवावे. नियमित व्यायाम, फिजियोथेरपी, वजनाचे व्यवस्थापन आणि शस्त्रक्रिया न करता केले जाणारे इतर उपचार यांच्या मदतीने गुडघ्यांतील वाढलेल्या वेदनांपासून सुटका मिळवता येते. हाडांतील कमी झालेले कॅल्शियम वाढवण्यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. वेदना, सूज, सांधा अडकणे किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर कोणत्याही गोळ्या-औषधांचे सेवन स्वतःच्या मनाने न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सांध्यातील नष्ट झालेले द्रव पूर्णपणे पूर्ववत करू शकेल असे कोणतेही पेय किंवा अन्नपदार्थ उपलब्ध नाही. मात्र संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहिले, तर गुडघे कायम निरोगी राहण्यास मदत होते. वजन वाढले की संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर येतो, म्हणून वाढलेल्या वजनाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. यात कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.