सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 319 | Very Poor 06:57 IST

अमेरिकन अधिकारी इराणच्या रडारवर; मध्यपूर्वेतील दूतावासांमधला स्टाफ कमी करायला सुरुवात

इराण अमेरिकन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचे कट रचत असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियासह मध्यपूर्वेतील आपल्या कार्यालयांची सुरक्षा वाढवली आहे.

अमेरिकन अधिकारी इराणच्या रडारवर; मध्यपूर्वेतील दूतावासांमधला स्टाफ कमी करायला सुरुवात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

इराणवर अमेरिका आणि इस्रायल पुन्हा जोरदार हल्ला करणार, अशी चर्चा सुरू असतानाच अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला आणखी एक गंभीर गोष्ट समजली. इराणकडून अमेरिकन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचे कट रचले जात आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली. त्यांनी लगेच अमेरिकन सरकारला निरोप दिला आणि सरकारही कामाला लागले. या माहितीमुळे वॉशिंग्टनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक जे क्लेटर यांनी २३ ऑक्टोबर रोजी परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांना एक निवेदन पाठवले. त्यात त्यांनी इराणच्या संभाव्य कारवायांबद्दल गंभीर इशारा दिला आहे. इराणने अमेरिकन कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक वाढवले आहेत आणि काही जीवघेण्या कटांवर आधीच काम सुरू झाले आहे, असे गुप्तचर माहितीत म्हटले आहे.

हे प्रयत्न फक्त मध्यपूर्वेपुरते मर्यादित नाहीत. इतरही काही देशांमध्ये अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजले आहे. मात्र नेमकी कोणती ठिकाणे आणि कोणत्या व्यक्ती निशाण्यावर आहेत, हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

येणाऱ्या हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने मध्यपूर्वेतील आपल्या राजनैतिक कार्यालयांमधली कर्मचारी संख्या कमी करायला सुरुवात केली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार इराणने आपली चाल खेळायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत कुठेही लपायचा प्रयत्न केला तरी इराणची मिसाईल्स आणि ड्रोन तिथपर्यंत पोहोचू शकतात, हे अमेरिकेला माहिती आहे. गेल्या काही काळातल्या युद्धांमध्ये अमेरिकेने याचा प्रत्यक्ष अनुभवही घेतला आहे.

गुप्तचर विभागाची माहिती मिळताच अमेरिकेने आपल्या कार्यालयांची सुरक्षा आणखी कडक केली आहे. सौदी अरेबियातील रियाध येथील दूतावासातले तसेच जेद्दाह आणि धहरान येथील वाणिज्य दूतावासांमधले अनावश्यक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय जॉर्डन, लेबनॉन, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमधली कर्मचारी संख्याही कमी केली जात आहे. तरीही या चार देशांमधले दूतावास मर्यादित कामकाजासह सुरू राहणार आहेत.

इराणबरोबरच येमेनमधील हुथींच्या वाढत्या हल्ल्यांमुळेही अमेरिकेची चिंता वाढली आहे. सौदी अरेबियातील तेल प्रकल्प, विमानतळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. सगळ्या आखाती देशांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की इराण चर्चेसाठी तयार झाला नाही तर अमेरिका पुन्हा जोरदार हल्ला करू शकते. त्यामुळे या दोन देशांमधला संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता दाट झाली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ