10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर CJP चे आंदोलन; भारतीय किसान युनियनचा पाठिंबा
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात राकेश टिकैत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी आता आणखी जोर धरताना दिसत आहे. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) या मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
या आंदोलनाला आता शेतकरी संघटनांचाही पाठिंबा मिळाला आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
संघटनेच्या सहभागाची माहिती भारतीय किसान युनियनचे यूपी युवा प्रदेशाध्यक्ष अनुज सिंह यांनी दिली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडीओ टाकून संघटना या आंदोलनात उतरणार असल्याचे सांगितले.
अनुज सिंह यांनी 10 ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने दिल्लीत यावे, असे आवाहन केले आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी तयार आहेत, असा इशारा त्यांनी दिला. तसेच ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
व्हिडीओ संदेशात अनुज सिंह यांनी मतदानाच्या अधिकाराचा मुद्दाही उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला दिलेला 'एक मत' हा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
ज्ञानेश कुमार हे केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपचे लाडके आहेत, असा आरोप करत देशात हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही अनुज सिंह यांनी म्हटले आहे.
हे आंदोलन केवळ एका राजकीय पक्षाचे नसून सामान्य नागरिकांचे आंदोलन आहे, असा दावा अनुज सिंह यांनी केला. त्यामुळे देशभरातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी 10 ऑक्टोबरला पूर्ण ताकदीने जंतर-मंतरवर जमा व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी संघटनेने आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर CJPकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. राकेश टिकैत आणि भारतीय किसान युनियनने आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल CJPने त्यांचे आभार मानले आहेत. शेतकरी आणि सामान्य जनता एकत्र आल्याने लोकशाही वाचवण्याचा लढा आणखी मजबूत होईल, असा दावा CJPने केला आहे.
दरम्यान, 10 ऑक्टोबरच्या जंतर-मंतर आंदोलनात राकेश टिकैत यांच्या सहभागामुळे आंदोलनाला किती मोठे स्वरूप मिळते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.