दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नागपूरच्या तिघांना चंद्रपुरात बकरी चोरीप्रकरणी अटक, कारही जप्त

नागपूरच्या तिघांना चंद्रपुरात बकरी चोरीप्रकरणी अटक, कारही जप्त छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

चंद्रपूर शहर पोलिसांनी बकरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत नागपूर येथील तिघांना अटक केली. चोरीला गेलेल्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली.

चंद्रपूर शहर पोलिसांनी बकरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून नागपूर येथील तिघांना अटक केली आहे. हा गुन्हा चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला होता. चोरीला गेलेल्या बकऱ्या आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, जप्त केलेला एकूण मुद्देमाल सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा आहे. अटक केलेले तिघेही नागपूर येथील रहिवासी आहेत आणि त्यांच्यावर बकरी चोरीचा आरोप आहे.

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बकऱ्या चोरीला गेल्याची तक्रार फिर्यादी यांनी दाखल केली होती. त्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आणि तपास सुरू झाला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला.

या शोधात पोलिसांनी रजत व्यंकटी देवघरे (वय २६, रा. वैशाली नगर, नागपूर), धरमवीर श्रीराम चौव्हान (वय ३७, रा. शशिकांत सोसायटी, गोरेवाडा, नागपूर) आणि मोहम्मद साजीद खलील कुरेशी (वय ४०, रा. हंसापुरी कसाबपुरा, नागपूर) या तिघा संशयितांना आधी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर बकरी चोरीच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली त्यांनी दिली, असे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली.

आरोपींकडून चोरीला गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेली फोर्ड फिगो कार (क्रमांक MH-14-CK-0839) जप्त करण्यात आली. हा सगळा मुद्देमाल अंदाजे २ लाख ३० हजार रुपयांचा आहे. या धडक कारवाईमुळे शहरात चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाने यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे आणि कपिल घुगे यांनी तपास केला. त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार संजय धोटे, संतोष दंडेवार, संतोष कनकम, जावेद सिद्दीकी, रूपेश रनदिवे, कपूरचंद खरवार, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, खंडेराव माने, सुशांत घिवे, प्रशांत कुसरे, सारिका गौरकर, दीपिका झिगरे, लीना काटवले, कार्तिक खनके आणि सायबर पोलीस स्टेशनचे पथक या कारवाईत सहभागी होते.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ