गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

म्हाडा कॉलनीत एकाच रात्री सहा घरफोड्या, पिगी बँकेपासून दागिन्यांपर्यंत चोरट्यांनी लांबवले

म्हाडा कॉलनीत एकाच रात्री सहा घरफोड्या, पिगी बँकेपासून दागिन्यांपर्यंत चोरट्यांनी लांबवले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

छत्रपती संभाजीनगरमधील तीसगाव येथील म्हाडा कॉलनीत मंगळवारी मध्यरात्री सहा बंद घरांच्या कड्या कापून घरफोडी झाली. सीसीटीव्हीत तीन संशयित दिसले असून वाळूज पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता तीसगाव येथील म्हाडा कॉलनी परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री सहा घरांना लक्ष्य केले. मंगळवारी मध्यरात्री 'राज स्वप्नपूर्ती अपार्टमेंट'मधील सहा बंद फ्लॅट आणि रो-हाऊसच्या कड्या तोडून घरफोडी करण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री अपार्टमेंटच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर बाहेरगावी गेलेल्या रहिवाशांची घरे हेरून त्यांनी कटरच्या साहाय्याने दरवाजांच्या कड्या कापल्या. बंद घरांची पाहणी करून हात साफ करणारे सराईत चोरटे या मागे असल्याचे सांगितले जात आहे.

डी-१ इमारतीत राहणारे शानसिंह भाटी हे कुटुंबासह पुण्याला गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटातून ३ ग्रॅम सोन्याच्या बाळ्या आणि ३ हजार रुपये रोख लांबवले. त्याच इमारतीतला डी-१०३ क्रमांकाचा फ्लॅट रिकामा होता. तोही फोडण्यात आला, मात्र तिथे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा डी-२ इमारतीतील ११२ क्रमांकाच्या फ्लॅटकडे वळवला. तिथे राहणारे अनिल लकारे बाहेरगावी गेलेले असताना कपाटाचे कुलूप फोडून मुलांच्या बचतीच्या डब्यातील (पिगी बँक) ५ ते ६ हजार रुपये आणि प्रत्येकी १० ग्रॅमच्या दोन चांदीच्या अंगठ्या पळवण्यात आल्या.

याशिवाय बी-२०३ क्रमांकाचे रो-हाऊस (साठे कुटुंबीय), डी-१ मधील ११४ क्रमांकाचा फ्लॅट (जोशी कुटुंबीय) आणि डी-२ मधील १०४ क्रमांकाचा फ्लॅट (शेळके कुटुंबीय) या बंद घरांच्याही कड्या कापण्यात आल्या. हे सर्व कुटुंब बाहेर असल्यामुळे नेमके काय आणि किती चोरीला गेले, याचा अचूक अंदाज घरमालक परतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

एकाच अपार्टमेंटमध्ये एकापाठोपाठ एक अशा सहा घरफोड्या झाल्याचे उघडकीस येताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा केला आणि अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या फुटेजमध्ये तीन संशयित कैद झाल्याचे दिसून आले आहे.

या फुटेजच्या आधारे वाळूज पोलीस त्या तीन संशयितांचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे म्हाडा कॉलनीतील रहिवाशांमध्ये चिंता आहे आणि चोरट्यांचा लवकर सुगावा लागावा, अशी अपेक्षा परिसरात व्यक्त होत आहे.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ