दीपोत्सव विशेष सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

रविवार, 8 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

हिंगणघाटचा धोकादायक दारुविक्रेता रविन्द्र डेकाटे एमपीडीए अंतर्गत छत्रपती संभाजीनगर कारागृहात

हिंगणघाटचा धोकादायक दारुविक्रेता रविन्द्र डेकाटे एमपीडीए अंतर्गत छत्रपती संभाजीनगर कारागृहात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारुविक्रेता रविन्द्र तुकाराम डेकाटे याला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धोकादायक दारुविक्रेता रविन्द्र तुकाराम डेकाटे (वय ४१, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) याला एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. वर्धाच्या जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानबद्धतेचा आदेश काढला होता.

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार डेकाटेविरुद्ध २०२० पासून हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये एकूण ८ गुन्हे नोंद आहेत. साथीदारांसह अश्लील शिवीगाळ करणे, मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे आणि खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे त्यात आहेत. तसेच साथीदारांसह गावठी मोहाच्या दारूची तस्करी आणि विक्री केल्याचेही गुन्हे नोंद आहेत. हद्दपार असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन शिवीगाळ करणे आणि मारण्याची धमकी देणे, हा आणखी एक गुन्हा नोंद आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार डेकाटेने हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या परिसरात लोकांच्या मनात मोठी दहशत निर्माण केली होती. त्या दहशतीमुळे अनेक पीडित त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार द्यायलाही धजावत नव्हते. यामुळे परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडून लोकांचे रोजचे जीवन विस्कळीत झाले होते.

त्याची गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६ (अ) (ब) आणि कलम ५६(१) (अ) (ब), फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १५१(१), १०७, ११६ (३) आणि कलम ११० (ग), एमपीडीए १९८१ चे कलम ३ तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १२९ (ई) यांचा समावेश आहे. मात्र अशा कारवाईलाही तो जुमानत नव्हता आणि त्यानंतरही सतत गुन्हे करत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

त्यामुळे हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफिया व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव वर्धाचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्यामार्फत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून डेकाटेला छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

वर्धा जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था टिकावी आणि सण उत्सव शांततेत पार पडावेत, या उद्देशाने अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींवर एमपीडीए कायद्याखाली कठोर कारवाई पुन्हा केली जाईल, असे संकेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आहेत.

२०२५ मध्ये एकूण १८ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगार एमपीडीए कायद्याखाली वेगवेगळ्या कारागृहांत स्थानबद्ध करण्यात आले होते. २०२६ मध्ये आतापर्यंत १३ गुंड प्रवृत्तीचे धोकादायक लोक आणि अवैध दारुविक्रेते वेगवेगळ्या कारागृहांत स्थानबद्ध झाले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडीक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पोलीस हवालदार अमोल आत्राम आणि आशिष महेशगोरी, तसेच पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार प्रविण देशमुख, संग्राम मुंडे, शिवशंकर यादव आणि संतोष लोहटे (हिंगणघाट पोलीस स्टेशन) यांनी ती केली.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ