संभाजीनगरमध्ये खासगी आस्थापनांना सीसीटीव्ही बंधनकारक, ५० मीटर परिसरावर कॅमेऱ्यांची नजर
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी आस्थापनांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करणारे आदेश काढले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी आस्थापनांना आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार यासंदर्भात आदेश काढले आहेत.
शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. हे आदेश ६ नोव्हेंबरपासून ४ जानेवारी २०२७ पर्यंत, म्हणजे ६० दिवसांसाठी लागू राहणार आहेत.
आदेशानुसार प्रत्येक आस्थापनेच्या सीमारेषेपासून ५० मीटरपर्यंतचा परिसर कॅमेऱ्यांच्या टप्प्यात येणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास सुरू ठेवावी लागेल आणि किमान १५ दिवसांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवावे लागेल. त्यासाठी प्लेबॅक आणि फुटेज कॉपी करण्याची सोयही उपलब्ध ठेवावी लागणार आहे, म्हणजे गरज पडली तर जुने फुटेज पाहता आणि त्याची प्रत काढता यावी.
बँका, एटीएम, हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोल पंप, ज्वेलर्स, शाळा, कॉलेज, रुग्णालये, धार्मिक स्थळे, जिम, चित्रपटगृहे, टॉवर्स आणि कार्यालयीन इमारतींसह सर्व खासगी आस्थापनांना या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.
आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्या, तर तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी मागणी केली, तर संबंधित फुटेज त्यांना उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित खासगी आस्थापनांनी ठरवून दिलेल्या निकषांनुसार सीसीटीव्ही यंत्रणा सुरू ठेवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.