आष्टीत वाघाच्या हल्ल्यात देवळालीचे शेतकरी देविदास टकले ठार
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात जनावरांसाठी गवत कापायला गेलेल्या देविदास टकले यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्यांचा मृत्यू झाला. वन विभागाने वाघाचा हल्ला असल्याचे निश्चित केले आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जीव गेला. देवळाली येथील शेतकरी देविदास टकले हे दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा आणायला गेले होते. त्यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. वाघाने त्यांना अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टकले जनावरांसाठी गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. बराच वेळ झाला तरी वडील घरी आले नाहीत, म्हणून त्यांचा मुलगा त्यांना शोधायला निघाला. शोध घेताना मुलाला जमिनीवर रक्ताच्या खुणा दिसल्या आणि वडिलांवर एखाद्या वन्यप्राण्याने हल्ला केल्याचा संशय त्याला आला. मुलाने आरडाओरडा केल्यावर वाघ तेथून पळून गेला. पण तोपर्यंत देविदास टकले यांचा मृत्यू झाला होता. टकले कुटुंबावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेनंतर वन विभागाने पाहणी केली. वनपरिक्षेत्राधिकारी अमोल मुंडे यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल, शरीरावरील जखमांच्या खुणा आणि वन विभागाची तपासणी यावरून हा हल्ला वाघानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या महिनाभरापासून आष्टी आणि पाटोदा परिसरात वाघाचा वावर असल्याचेही त्यांनी सांगितले. या वाघाचे लोकेशन देवळाली परिसरात असल्याचे वन विभागाच्या लक्षात आले होते, म्हणून स्थानिक नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन आधीच करण्यात आले होते.
वाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावेच लागते, त्यामुळे अशा घटना रोखणे हे मोठे आव्हान ठरले आहे.
आमदार सुरेश धस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. आष्टी तालुक्यातील लोखंडवाडी परिसरात देविदास टकले यांचा वाघाच्या हल्ल्यात झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वी याच रामलिंग वाघाच्या हल्ल्यात राजेंद्र गोल्हार यांचाही मृत्यू झाला होता, असे त्यांनी सांगितले. या वाघाला तातडीने रेस्क्यू करून जेरबंद करावे, यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. ट्रॅप कॅमेरे लावून आवश्यक ती कार्यवाही व्हावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही धस यांनी स्पष्ट केले.
वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत दौलावडगाव जिल्हा परिषद सर्कल आणि देवळाली पंचायत समिती गणातील नागरिकांनी एकट्याने शेतात किंवा जंगल परिसरात जाऊ नये, असे आवाहन धस यांनी केले आहे.
या हल्ल्यामुळे देवळाली, बावी आणि धामणगाव परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.