चंद्रपुरात रस्ते, गल्ल्या आणि चौकांत फटाके फोडण्यास महानगरपालिकेची बंदी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने वायू व ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी सार्वजनिक सूचना काढली आहे. शांतता क्षेत्रात १०० मीटरच्या परिघात निर्बंध असून ध्वनिक्षेपकासाठी लेखी परवानगी लागेल.
चंद्रपूर शहरात वाढत चाललेले वायू आणि ध्वनीप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. फटाक्यांचा अनियंत्रित वापर, ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजातला वापर आणि सार्वजनिक ठिकाणचा गोंगाट थांबवण्यासाठी महानगरपालिकेने सार्वजनिक सूचना जारी केली आहे.
या सूचनेनुसार सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथ आणि चौकांमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात घोषित शांतता क्षेत्र आहे. या क्षेत्रात १०० मीटरच्या परिघात ध्वनिक्षेपक आणि फटाके वापरण्यावर निर्बंध राहतील.
ध्वनिक्षेपक किंवा साऊंड सिस्टिम वापरायची असेल, तर सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक वापरल्यास किंवा ठरवलेली ध्वनीमर्यादा ओलांडल्यास संबंधित साहित्य जप्त केले जाईल आणि नियमानुसार दंडात्मक कारवाई होईल.
ध्वनीमर्यादा अशी निश्चित करण्यात आली आहे: औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात ६५ आणि ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात ५५ आणि ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात ५० आणि ४० डेसिबल.
नागरिकांच्या तक्रारींचे लवकर निराकरण व्हावे, यासाठी महानगरपालिकेने उपायुक्त श्री. संदीप चिद्रावार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तक्रार निवारण कक्ष अग्निशमन विभाग, चंद्रपूर महानगरपालिका येथे सुरू आहे. आपल्या परिसरातील ध्वनीप्रदूषणाबद्दल नागरिकांनी तिथे तक्रार नोंदवावी. निवारण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक १०१, ०७१७२ २५४६१४, ९८२३०१७१०१ १८००५३२१५७५ असा आहे.
प्रभागनिहाय ई-मेल आयडीही देण्यात आले आहेत: Zone-1: [email protected], Zone-2: [email protected], Zone-3: [email protected].
ध्वनीप्रदूषणमुक्त आणि स्वच्छ चंद्रपूर शहरासाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.